Gadchiroli Tiger | गडचिरोलीत नरभक्षक वाघाचा हैदोस; वाघाच्या बंदोबस्तासाठी शेतकरी धडकले वनविभागाच्या कार्यालयावर

| Updated on: May 15, 2022 | 5:18 PM

13 मे रोजी नलुबाई जागळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना सदर नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी 14 मे रोजी आरमोरी येथील शेतकरी नंदू गोपाळा मेश्राम हा कोसा विकासजवळ शेतात काम करीत असताना त्याचा सुद्धा या नरभक्षक वाघाने बळी घेतलेला आहे.

Gadchiroli Tiger | गडचिरोलीत नरभक्षक वाघाचा हैदोस; वाघाच्या बंदोबस्तासाठी शेतकरी धडकले वनविभागाच्या कार्यालयावर
वाघाच्या बंदोबस्तासाठी शेतकरी धडकले वनविभागाच्या कार्यालयावर
Image Credit source: t v 9
Follow us on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज आरमोरी तालुक्यात एक नरभक्षक वाघाने (Cannibal Tiger) हैदोस घातला आहे. या नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी चिंतित आहेत. आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथील एका महिला शेतकरी व आरमोरी येथील एक शेतकरी अशा दोन व्यक्तींचा नरभक्षक वाघाने बळी घेतला. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, वाघाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला पन्नास लाख रुपयांची मदत करण्यात यावी. सदर परिवारातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी. ज्या शेतात शेतकऱ्यांवर वाघाचे हल्ले होण्याची शक्यता आहे अशा शेतकऱ्यांना जमीन न करता वार्षिक एकरी 30 हजार रुपये देण्यात यावे. जंगलालगत शेतीला कुंपण करण्यासाठी तार देण्यात यावे. जंगलातील गावांचे पुनर्वसन करण्यात यावे. वाघाचा वास्तव असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना व जंगलामधील गावातील युवकांना शहरात रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभाचे (All India Kisan Sabha) जिल्हाध्यक्ष अमोल मारकवार, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम (District President Dilip Ghodam) यांच्या नेतृत्वात सतत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडकला.

नरभक्षक वाघाचे दोन दिवसांत दोन बळी

आरमोरी बर्डी टी पॉईंटवरून या मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघून वनविभाग कार्यालयावर धडकला. आरमोरी वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने गेल्या काही दिवसांपासून आरमोरी परिसरातील शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करून त्यांचा बळी घेतला आहे. 13 मे रोजी नलुबाई जागळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना सदर नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी 14 मे रोजी आरमोरी येथील शेतकरी नंदू गोपाळा मेश्राम हा कोसा विकासजवळ शेतात काम करीत असताना त्याचा सुद्धा या नरभक्षक वाघाने बळी घेतलेला आहे. सदर वाघाने माणसांवर हल्ला करून त्याचा बळी घेतला आहे. आरमोरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकऱ्याला शेतात जाऊन काम  करणे अवघड झालेले आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुबार पेरणी असल्यामुळे शेतकऱ्याचे  शेतात उभे पीक आहे. अशा परिस्थितीत वाघाच्या भीतीमुळे शेतात न गेल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच शेतात गेल्यावर वाघाच्या हल्ल्याची भीती सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये या भागाच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. यावेळी शेतकऱ्यांनी देसाईगंजचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे यांना निवेदन दिले.

शार्पशूटरची 9 जणांची टीम आरमोरीत दाखल

यावेळी सहाय्यक वन संरक्षक वायभासे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या वतीने 10-10  कर्मचाऱ्यांच्या तुकड्या जंगलालगतच्या भागात तैनात केलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या तुकड्या सकाळी 5 वाजतापासून ते रात्री 9 वाजतापर्यंत राहणार आहेत. सकाळी 9 वाजतानंतरच शेतकऱ्यांनी शेतात जाऊन सायंकाळी 5 वाजता परत यावे. तसेच सदर नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शार्पशूटरची 9 जणांची टीम आरमोरीत दाखल झाली. येत्या 4 ते 5 दिवसांत ही टीम वाघाला जेरबंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चात भारतीय किसान संघाचे अमोल मारकवार, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम, रामदास जराते, राष्ट्रवादीचे संदीप ठाकूर, वृक्षवल्ली संस्थेचे देवानंद दुमाणे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र शेंडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे,  शेकडो नागरिक व शेतकरी मोर्च्यात सहभागी झाले होते. काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हे सुद्धा वाचा