‘ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट…’ शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याने धरला ठेका; गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष

| Updated on: Nov 23, 2021 | 7:32 PM

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झालाय. शिंदे यांच्या या पराभवाने भाजपला आनंद झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.

ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट... शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याने धरला ठेका; गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष
ncp leader
Follow us on

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झालाय. शिंदे यांच्या या पराभवाने भाजपला आनंद झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. शिंदे यांच्या या पराभवाने त्यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांनाच प्रचंड आनंद झाला आहे. बरं हा नेता केवळ आनंद व्यक्त करून थांबला नाही. गुलालांची प्रचंड उधळण करत आणि ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट…. या गाण्यावर जबरा ठेका धरत या नेत्याने आनंद व्यक्त केला. त्यामुळे साताऱ्यात जशी शिंदे यांच्या पराभवाची चर्चा सुरू आहे, तसेच या नेत्याचा ‘नाद’ही चर्चेचा विषय बनला आहे.

वसंतराव मानकुमरे असं या राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव आहे. ते राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत. मानकुमरे आणि शशिकांत शिंदे यांच्यातील वैर संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रृत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक लागल्यापासून मानकुमरे यांनी शिंदे यांची जागोजागी कोंडी केल्याचं सांगितलं जातं.

मतदारांची टूर टूर

या निवडणुकीत मानकुमरे यांनी थेट विरोधी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना उघड पाठिंबा दिला होता. तसेच जावळी मतदारसंघातील निवडणूक मतदान प्रतिनिधांना महिभार टूर घडवली होती. या 25 मतदारांना केरळपासून ते गोव्यापर्यंत त्यांनी फिरवून आणले होते. तेव्हाच शिंदे यांना निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. झालेही तसेच.

गुलाल उधळत ताल धरला

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत रांजणे यांना 25 तर शिंदे यांना 24 मते मिळाली. अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मानकुमरे प्रचंड खूश झाले. त्यांनी आपल्या समर्थकांसह गुलालाची उधळण करत आणि डीजे लावत जल्लोष केला. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट…. या गाण्यावर त्यांनी थेट तालच धरला. मानकुमरे यांचा जबरा डान्स पाहून कार्यकर्तेही आश्चर्यचकीत झाले आणि त्यांनीही ताल धरला. यावेळी मानकुमरे यांच्यासह त्यांचे समर्थक गुलालांनी माखून गेले होते.

समर्थकांचा राडा

दरम्यान, शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच राडा केला. स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचं सांगत शिंदे समर्थकांना थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक केली. यावेळी शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: आधी औरंगाबाद आणि आता सोलापूर, मुस्लिम आरक्षण हाच ओवेसींचा निवडणूक अजेंडा?

Sangli District Bank Elections | सांगली जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता, मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ पराभूत

VIDEO: शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शिंदे समर्थक भडकले, थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक