तुफान दगडफेक, वाहने जाळली… नंदूरबार आणि नगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
नंदूरबार आणि अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

जितेंद्र बैसाने, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नंदूरबार : संभाजीनगर जिल्हा आणि मुंबईतील मालवणीमधील तणाव निवळलेला असतानाच आता नंदूरबार आणि नगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही जिल्ह्यात रात्रीच्यावेळी दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर वाहने जाळली. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही जिल्ह्यात ज्या भागात राडा झाला त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी झालेल्या राड्याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पोलीस या राड्याच्या कारणांचाही शोध घेत आहेत.
नंदूरबार येथे काल रात्री ही घटना घडली. शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दोन गटात तुफान दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी वाहने पेटवली. त्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. त्यामुळे दोन पोलीस जखमी झाले. मात्र, पोलिसांनी आपली कार्यवाही सुरूच ठेवत जमाव पांगवला आणि तणाव नियंत्रणात आणला. या दंगलीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या हाणामारीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते.
सोशल मीडियावर वॉच
नंदूरबारमधील दोन गटातील हाणामारी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 ते 16 जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सायबर सेल सोशल मीडियावर वॉच ठेवून आहे. सोशल मीडियावरून कोणत्याही अफवा पसरू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. मात्र, सध्या नंदूरबारमधील तणाव निवळला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नगरमध्ये किरकोळ वादातून राडा
अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. काल रात्री हा प्रकार घडला. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगर येथे ही घटना घडली. या दगडफेकीत चार ते पाचजण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांव नगर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दगडफेकीत दोन मोटरसायकलसह एका स्विफ्ट कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 10 ते 12 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नगरच्या छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगरमध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असतानाच मुकुंद नगर परिसरात देखील दगडफेक झाली. त्यामुळे शहरातील या संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरातील वातावरण सध्या निवळलं आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
