अजित पवार भावी मुख्यमंत्री? यावर संजय राऊत यांचं उत्तर आणि एक सर्वात मोठा दावा

| Updated on: Apr 22, 2023 | 11:48 AM

ठाकरे गटाची उद्या रविवारी जळगावात सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत जळगावात आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

अजित पवार भावी मुख्यमंत्री? यावर संजय राऊत यांचं उत्तर आणि एक सर्वात मोठा दावा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 2024ची वाट का पाहायची? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. अजितदादा यांच्या या इच्छेवर सत्ताधारी वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यावर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांच्यात क्षमता आहे. ते अनुभवी आहेत. अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, असं सांगतनाच लायकी नसताना काही लोक मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे.

ठाकरे गटाची उद्या जळगावात सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधणार आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत जळगावात आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. त्यावर त्यांनी हे विधान केलं. अजित पवार यांची मुलाखत ऐकली नाही. काय आहे त्यात मला माहीत नाही. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही? त्यांच्यात क्षमता आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. अनेक वर्ष मंत्री आहेत. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून, तोडफोड करून मुख्यमंत्री झाले. एखाद्याच्या भाग्यात लिहिलं असेल तर होत असतात. माझ्या अजितदादांना शुभेच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

वकिली करत नाही

अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत काय? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. अजित पवार राष्ट्रवादीतच राहणार आहेत. ते राष्ट्रवादीतच राहतील. असं उत्तर देतो म्हणजे मी कुणाची वकिली करत नाही. मी महाविकास आघाडीची वकिली करतो, असा चिमटाही त्यांनी अजित पवार यांना काढला.

त्यानंतर पाहू

आम्ही विरोधी पक्षात आहोत. 2024 साली आम्ही परत सत्तेत येऊ. त्यानंतर पाहू. वज्रमुठ सभा ही एका पक्षाची नाही. तीन पक्षाची आहे. सभेत कोणी बोलायचं? सभा कुठे घ्यायची? कधी घ्यायची? हे आघाडीत ठरतं, असं त्यांनी सांगितलं.

तुमची राजकीय नसबंदी

संजय राऊत यांनी जीभेची नसबंदी करावी असं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. तुमची राजकीय नसबंदी झाली आहे ना? मी कुणाला आमंत्रण देत नाही. आमच्या पत्रकार परिषदेची पोटशूळ आहे. तुमचे नेते भाजपचे पोपट म्हणून बोलतात. आम्ही जंगलातील वाघ आहोत. तुम्ही मांडलिक आहात. गुलाम आहात, असा हल्ला राऊत यांनी चढवला.