तिरोड्यात मॉर्निंग वॉकला गेलेला अभियंता अपघातात ठार, चारचाकी वाहनाने दिली धडक
गोंदिया : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अभियंत्याचा चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात 13 नोव्हेंबरला सकाळी साडेसहाच्या दरम्यान झाला. तिरोड्यातील साई कॉलनीत राहणारे निखिल राजू उपरकर (वय 32) असं मृतकाचं नाव आहे.

गोंदिया : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अभियंत्याचा चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात 13 नोव्हेंबरला सकाळी साडेसहाच्या दरम्यान झाला. तिरोड्यातील साई कॉलनीत राहणारे निखिल राजू उपरकर (वय 32) असं मृतकाचं नाव आहे.
चालकाला डुलकी लागल्याने अपघात
तिरोड्यातील निखिल हे आपले वडील राजू (वय 60) व बहीण नेहासोबत (वय 29) मॉर्निंग वॉकला जात होते. तिरोडा-तुमसर मार्गावरून मॉर्निंग वॉक करून परत येत होते. दरम्यान, गणेश सर्वो पेट्रोल पंपासमोरून चालत असताना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. चालक प्रणय मुकेश उके (वय २२) याला डुलगी लागल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे.
बहीण नेहा अपघातात जखमी
या अपघातात निखिल वाहनाच्या धडकेत दहा फूट अंतरावर फेकले गेले. त्यांचा पाय मोडला. शिवाय डोक्याला मार लागून ते ठार झाले. या अपघातात निखिल यांची बहीण नेहा यांच्यासुद्धा पायाला जखम झाली. शिवाय राजू उपरकर यांच्या गुडघ्याला थोडासा मार लागला. लग्नाच्या पाहुण्यांची गाडी थांबवून निखिल व नेहाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी निखिलला मृत घोषीत केले.
निखिल पुण्यातील कंपनीत होते इंजिनीअर
निखिल हे पुणे येथे कॅप जेमिनी कंपनीमध्ये साप्टवेअर इंजिनिअर होते. २०१४ पासून ते पुणे येथे काम करीत असल्याचे घरच्यांनी सांगितले. लाकडाऊनपासून ते वर्क फ्रॉम होम करीत होते. निखिल हे अत्यंत प्रेमळ व समजूतदार होते. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी अंतिम संस्कार तिरोडा येथील स्थानिक स्मशानभूमीत करण्यात आले. घटनेची तक्रार मृतकाचे काका भास्कर उपरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जोगंदळ तपास करीत आहेत.
इतर बातम्या
वडधामन्यात युवतीची आत्महत्या, घरीच ओढणीने घेतला गळफास
नागपुरातली 16 ठिकाणं धोकादायक, प्रदूषणात झपाट्यानं वाढ, फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढला?