VIDEO: मी मागच्या जन्मी पाप केलं, पण आता बाहेर पडलोय, साखरसम्राटांच्या भरसभेत गडकरींचं वक्तव्य, काय घडलं?

| Updated on: Oct 02, 2021 | 3:18 PM

मी मागच्या जन्मी पाप केलं, पण आता त्यातून बाहेर पडलोय. हे विधान आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं. (nitin gadkari)

VIDEO: मी मागच्या जन्मी पाप केलं, पण आता बाहेर पडलोय, साखरसम्राटांच्या भरसभेत गडकरींचं वक्तव्य, काय घडलं?
नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
Follow us on

नगर: मी मागच्या जन्मी पाप केलं, पण आता त्यातून बाहेर पडलोय. हे विधान आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं. विशेष म्हणजे साखरसम्राटांच्या भरसभेत गडकरींनी हे विधान केलं. त्यामुळे साखरसम्राटांच्या भुवया उंचावल्या.

नगरमध्ये एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हे विधान केलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुजय विखेपाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मी नेहमी स्पष्ट बोलतो. मला साखर कारखानदारी समजल्यामुळे, मी मागच्या जन्मी पाप केल्यामुळे मी साखर कारखानदारीतून बाहेर पडलो आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार मी तीन साखर कारखाने चालवत होतो. साखर कारखानदारीतून आपण बाहेर पडू शकतो. हे कसं शक्य होणार. आपण हे समजून घेतलं पाहिजे की शेतकरी जिवंत राहिले तर कारखाने जिवंत राहतील. कारखान्याची नरडी पकडून बंद करायचं ठरवलं अन् तुमचा ऊसच घेणारे टिकले नाही तर ऊस कुठं पिकवणार तुम्ही. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचं शोषण करू नये, असं आवाहन गडकरी यांनी केलं.

अर्थचक्र जर उलटं फिरलं तर…

आपल्या देशात 240 लाख टन साखरेची गरज आहे. मागच्या वर्षी आपण निर्मिती केली 310 लाख टन साखरेची. म्हणजे आपण 70 लाख टन साखर अधिक तयार केली. त्यामुळे मी म्हणतो महाराष्ट्राने आणि देशाने आता नवीन साखर कारखाने काढण्यास बंदी आणली पाहिजे. नाही तर परिस्थिीती खराब होईल. साखर कोणी घेतच नाही. हे अर्थचक्र जर उलटं फिरलं तर शेतकऱ्यांना परवडणार नाही, बँकाही डुबतील आणि कारखानेही बंद पडतील, अशी धोक्याची सूचनाही गडकरींनी दिली.

म्हणून साखरेचा भाव वाढवला नाही

ब्राझिलमध्ये दोन महिन्यापूर्वी 22 रुपये किलो साखरेचा भाव होता. आम्ही कमीत कमी 31 रुपये किलो साखरेचा भाव ठेवला होता. त्या कमिटीत मी सुद्धा आहे. आम्हाला साखरेचा भाव 2 रुपयांनी वाढवायचा होता, पण वाढवला नाही. कारण साखर महाग होईल असं सर्वांना वाटलं. पण आज मात्र ब्राझिलमध्ये साखरेचं उत्पादन कमी आहे. तिकडे दुष्काळ आहे. त्यामुळे दोन तीन महिन्यात साखरेत थोडी तेजी आली. त्यामुळे येणारी साखर जास्तीत जास्त निर्यात करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हायड्रोजनची निर्मिती करा

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या कार्यक्रमात महत्त्वाच्या सूचना केल्या. ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. इथेनॉल ऐवजी हायड्रोजन गॅस निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हायड्रोजन हे इथेनॉलच्या पुढची अवस्था आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राटांना धक्क्यावर धक्के

नगर जिल्ह्यासाठी तीन मोठ्या घोषणा, गडकरी मिष्किलपणे म्हणाले, असं वाटतं, मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालोय!

उद्धव ठाकरेंची शिर्डीत नवं शहर वसवण्याची घोषणा, गडकरी म्हणतात, उत्तम निर्णय!

(union minister nitin gadkari address in nagar program)