Gokul: गोकुळचा चेअरमन कोण? सतेज पाटील यांची मोठी घोषणा, महायुतीचे 12 संचालक पाठिंबा देणार?
Gokul Chairman Satej Patil: कोल्हापूरातील 500 कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या गोकुळवर सरकारला कब्जा करायचा नाही अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्याचवेळी आमदार सतेज पाटील चेअरमन पदासाठी हे नाव सुचवलं, आता महायुतीचे 12 संचालक पाठिंबा देतील का?

Gokul Kolhapur Cooperative Milk Producers Sangh : कोल्हापूर दूध उत्पादक संघ, गोकुळवरून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळवर कब्जा करण्याचा सरकारचा उद्देश नसल्याचा दावा केला. पण मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा वेगळा सूर लपलेला नाही. महायुतीतच एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्ता टाकला आहे. त्यांनी गोकुळचा चेअरमन कुणाला करायचं हे नावच समोर आणलं. जर तुम्हाला गोकुळवर कब्जा करायचा नाही तर आपण सुचवलेल्या नावाला महायुतीच्या 12 संचालकांनी पाठिंबा द्यावा, अशी खेळी त्यांनी खेळली.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
गोकुळच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भूमिका मांडली. गोकुळ इतकी मोठी संस्था नाही, त्यामुळे सरकारला त्यावर कोणताही कब्जा करायचा रस नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त संचालक नेमण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आपल्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार असा तिघांच्या सहमतीनेच आणला गेला होता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सतेज पाटील यांनी नियमांवरच ठेवले बोट
तर आमदार सतेज पाटील यांनी नियमांवर अचूक बोट ठेवले. वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही? असा नेमका सवाल विचारून पाटील यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असं आमचं म्हणणं आहे. न्यायालयातही आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे. असे जर आपले म्हणणे असेल तर 13 जणांचा कोरम होतो आणि आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही? असा रोकडा सवाल सतेज पाटील यांनी केला.
शशिकांत पाटील यांना पाठिंबा
तर सतेज पाटील यांनी यावेळी गोकुळचे चेअरमन म्हणून शशिकांत पाटील यांचे नाव समोर आणले. 10 नोव्हेंबर रोजी सभा होत आहे. गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांना महायुतीच्या 12 संचालकांनी चेअरमन म्हणून पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरील विश्वासही वाढेल. पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व 25 संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सतेज पाटील म्हणाले.