वैभव सूर्यवंशीला नडला, पाकिस्ताननेच आता सॅम अय्यूबला आरसा दाखवला; माजी क्रिकेटरने झापलं!
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर सॅम अय्यूब याने विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केले. एखाद्या लहान मुलाला हातांवर घेऊन खेळवत असल्याची कृती त्याने स्टेडियमवरच केली. वैभव सूर्यवंशी अद्याप बाळ आहे, असं त्याला सुचवायचं होतं.

India Vs Pakistan Match : भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीला सगळेच ओळखतात. तो मैदानात उतरला की धावांचा पाऊस पडतोच. 3 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा 2026 मधील सुवर्ण पदकासाठी दमदार सामना रंगला. या सामन्यात वैभव सूर्यवंशी फार काही चांगली फलंदाजी करू शकला नाही. त्याला फक्त 15 धावाच करता आल्या. याच सामन्यात त्याला बाद केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू सॅम अय्यूबने केलेलं सेलिब्रेशन वादात सापडलं आहे. त्याने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं, त्यावर आक्षेप घेतला जातोय. विशेष म्हणजे पाकिस्तानातीलच क्रिकेटचे चाहते आणि माजी क्रिकेटपटू त्याच्यावर सडकून टीका करतायत.
अशा प्रकारची कृती योग्य वाटत नाही
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर सॅम अय्यूब याने विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केले. एखाद्या लहान मुलाला हातांवर घेऊन खेळवत असल्याची कृती त्याने स्टेडियमवरच केली. वैभव सूर्यवंशी अद्याप बाळ आहे, असं त्याला सुचवायचं होतं. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याने अय्यूबच्या याच सेलिब्रेशनचा समाचार घेतला आहे. “तुम्ही ती अॅक्शन पाहिली का? ते किती वाईट वाटतं. तुम्ही एवढं चांगलं क्रिकेट खेळत आहात. बऱ्याच काळानंतर पाकिस्तान भारताविरोधात क्रिकेट खेळतोय. असं असताना अशा प्रकारची कृती योग्य वाटत नाही,” अशा शब्दांत कामरान अकमल याने अय्यूब याचा समाचार घेतला. कामरान अकमल ‘गेम प्लॅन’ या यूट्यूब चॅनेलवरील शोमध्ये बोलत होते.
HMM…THAT’S SOME CELEBRATION! 🤨 🍼
Saim Ayub knows how BIG BOSS BABY’s wicket was 🙆
Watch Pakistan vs India in the Men’s Cricket Final at the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.
#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames #AichiNagoya2026 #BaarBaarBharatHarBaarBharat
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) October 3, 2026
त्याने स्वत:च्या कामगिरीवर लक्ष दिले पाहिजे
“पाकिस्तानची कामगिरी खूप चांगली नाही. परंतु सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आपण हे असं करत आहोत. मॅनेजमेंटनेही याबाबत विचार करायला हवा. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. वैभव सूर्यवंशी 13, 14, 15 पंधरा वर्षाचा असला तरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळतोय हे खूप महत्त्वाचे आहे. सॅम अय्यूब हा काही लहान नाही. त्याने स्वत:च्या कामगिरीवर लक्ष दिले पाहिजे,” असा संतापही कामरान अकमल याने व्यक्त केला. दरम्यान, या सामन्यात वैभव सूर्यवंशी फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी अभिषेक शर्माने मात्र पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याच्या खेळाच्या जोरावर भारताला विजयापर्यंत पोहोचता आले.