पेपर टाकणारा तरुण इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं, कोरोनाने भरल्या ताटावरुन 24 वर्षांच्या शुभमला नेलं

| Updated on: Apr 29, 2021 | 3:18 PM

पहिल्यांदा पंढरपूरमध्ये शुभम भोसलेने उपचार घेतले. मात्र त्रास वाढू लागल्याने त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. (Pandharpur Engineer Dies of Corona)

पेपर टाकणारा तरुण इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं, कोरोनाने भरल्या ताटावरुन 24 वर्षांच्या शुभमला नेलं
पंढरपूरचा २४ वर्षीय तरुण शुभम भोसलेचा मृत्यू
Follow us on

पंढरपूर : दररोज पहाटे दारोदार फिरुन पेपर टाकण्याचे काम करत एक तरुण इंजिनियर झाला. त्यासाठी वडीलही खूप कष्ट करत होते. या तरुणाने शिक्षणात आपली चमक दाखवली आणि त्याला बड्या कंपनीत नोकरीही मिळाली. नोकरीसोबतच लग्नही जमलं. कुटुंब आनंदात असतानाच तरुणाला कोरोना झाला. उपचार केले, मात्र कोरोनारुपी काळाने त्याला हिरावून नेले. क्षणार्धात आयुष्यभर केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्नं, हातून निसटून गेली. ही हृदयद्रावक कथा आहे पंढररपूरमधील कष्टकटी भोसले कुटुंबाची. (Pandharpur 24 years old Engineer Shubham Bhosle Dies of Corona)

कॉम्प्युटर इंजिनियरिंगची पदवी

उमदा अभियंता शुभम भोसले हा पहिल्यापासून अतिशय हुशार म्हणून शाळेत नावाजला जायचा. घरची गरिबी असल्याने लहानपणापासून वडिलांना घरोघरी पेपर टाकण्यात मदत करायचा. वडील सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते होते. त्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून शुभमचा दिवस सुरु व्हायचा. वडिलांना मदत करत तो शिक्षण घेत होता. बारावीला चांगले मार्क मिळाल्याने त्याला कुठेही प्रवेश मिळू शकत असता. पण घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत पंढरपूर येथील स्वेरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेत त्याने कॉम्प्युटर इंजिनियरिंगची पदवी चांगल्या गुणांनी मिळवली.

कोलकात्यात नोकरी, साखरपुडाही झाला

उत्तम गुणांच्या जोरावर त्याला कोलकाता येथे टीसीएस या मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. आता भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती. कोरोनाच्या संकटामध्ये शुभम घरुनच कंपनीचे काम अखंड करत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह निश्चित होऊन साखरपुडाही झाला. आता सगळे चांगले घडणार या स्वप्नात सोमनाथ भोसले आणि त्याचे कुटुंब असतानाच चार पाच दिवसापूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली.

सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास

पहिल्यांदा पंढरपूर येथेच त्याने उपचार घेतले. मात्र त्रास वाढू लागल्याने त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र कोरोनारुपी काळाने आज पहाटे त्याला सगळ्यातून हिरावून नेले. आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा अवघ्या 24 वर्षांचा शुभम अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेला. ज्या मुलाच्या भविष्यासाठी वडील सोमनाथ भोसले यांनी जीवापाड कष्ट केले, त्यांना चांगले दिवस दिसू लागताच काळाने हा घाला घातला. शुभमच्या मृत्यूने भोसले कुटुंबावर आभाळच कोसळले असून पंढरपूरकरांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

सासऱ्यांपाठोपाठ पतीचाही कोरोनाने मृत्यू, चीनहून पत्नीचा व्हिडीओ कॉलमधून अखेरचा निरोप

औरंगाबादमध्ये कोरोनामुळे एक महिन्याच्या बाळाचा मृत्यू

(Pandharpur 24 years old Engineer Shubham Bhosle Dies of Corona)