‘आषाढी वारीसाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करु’, सरकार निर्णय घेत नसल्यानं वारकऱ्यांचा इशारा

विदर्भातून जाणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी नागपूरच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशारा वारकऱ्यांनी दिलाय.

'आषाढी वारीसाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करु', सरकार निर्णय घेत नसल्यानं वारकऱ्यांचा इशारा
आषाढी वारी फाईल फोटो

अकोला : मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे वारीला मुकावे लागलेल्या वारकऱ्यांनी यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केलीय. त्याबाबत पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत एक बैठकही पार पडली. पण त्याबाबत अद्याप सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आमच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त करत विदर्भातून जाणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी नागपूरच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशारा वारकऱ्यांनी दिलाय. (Warkari warn to file public interest litigation in Nagpur court for Ashadhi Wari)

आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून मानाच्या 9 पालखी सोहळ्यात किमान पाचशे वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. मानाच्या पालखीचे व्यवस्थापक, काही फडकरी संघटनाा आणि विश्व वारकरी सेनेनं ही मागणी केली आहे. वारकऱ्यांची ही मागणी योग्य असून सरकारने ती पूर्ण करावी, असं वारकऱ्याचं मत आहे. मात्र, महाराष्ट्रात मानाच्या पालखीच्या व्यतिरिक्त शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बऱ्याच पालख्या आहेत. यातील प्रत्येक पालखीसोबत फक्त दहा वारकऱ्यांना वाहनाने जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विश्व वारकरी सेनेनं केली आहे. अशी मागणी मागील वर्षीही करण्यात आली होती. पण सरकार या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास तयार नाही. पण विदर्भातून जाणाऱ्या पालखी सोहळ्याला कोणत्याही प्रकारची व्यवस्था दिली जात नसल्याचंही वारकऱ्यांनी म्हटलंय.

पंढरपूरमध्ये निवडणूक होते, वारी का नाही?

सरकारकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. त्यामुळे नागपूर न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करणार आहोत. कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा प्रश्न न्यायालयात विचारला जाणार आहे. तशी माहिती विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेटे महाराज यांनी दिलीय.

वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक

आषाढी वारीला परवानगी मिळावी या मागणीसाठी 28 मे ला वारकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पुण्यात पार पडली आहे. यावेळी अजित पवार यांनी या सर्वांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच यावर लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा केली. तसेच पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली.

“सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आवश्यक”

अजित पवार म्हणाले, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज (28 मे) जाणून घेण्यात आली आहेत. वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार आहे.”

संबंधित बातम्या :

विठुराया चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला! आख्यायिका काय?

प्रशासनानं वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, बंडातात्या कराडकर यांच्याकडून देहूच्या वेशीवरील आंदोलन स्थगित

Warkari warn to file public interest litigation in Nagpur court for Ashadhi Wari

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI