अखेर पार्थ पवारांनी सस्पेंन्स संपवला, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याविषयी सगळं सांगून टाकलं; म्हणाले अढळ निष्ठा..
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी 28 जानेवारीनंतर केलेल्या पत्रव्यवहारातील मागण्यांकडे दुर्लक्ष करावे, असे सांगितले आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे.

Sunetra Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका पत्रामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार द्यावेत, अशी मागणी या पत्राद्वारे केली होती. दरम्यान, अगोदरच राष्ट्रवादी पक्ष हायजॅक केला जातोय, असा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यानंतर हे पत्र समोर आल्यानंतर वेगवेगळे दावे केले जात आहेत. असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार पार्थ पवार यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले जात आहे, असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
पार्थ पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे?
निराधार बातम्या आणि केवळ तर्क-वितर्कांवर आधारित कथा यांद्वारे प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांचे अनेक दशकांचे निष्ठावान योगदान आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहे. अशा वरिष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, याचा ठामपणे निषेध केला पाहिजे, असे पार्थ पवार म्हणाले आहेत.
Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction.
Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all.
Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate…
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 2, 2026
पडद्यामागे नेमकं काय घडलं?
अजितदादा यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल आणि सुनि तटकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रात पक्षाच्या कार्याध्यक्षांनाही राष्ट्रीय पक्षाध्यक्षाप्रमाणेच अधिकार द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर 10 मार्च रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. या पत्रात 28 जानेवारीनंतर निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार आणि त्यात केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करावे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळेच पटेल आणि तटकर यांना बाजूला सारण्यात आले का? असे विचारले जात होते.