अकोल्यात महादेवाच्या पिंडीला डोळे दिसत असल्याची चर्चा, चमत्कार की दुसरं काही?

| Updated on: Feb 27, 2023 | 7:55 PM

अकोल्यातील महादेवाच्या मंदिरात पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येत गर्दी झाली. या प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय.

अकोल्यात महादेवाच्या पिंडीला डोळे दिसत असल्याची चर्चा, चमत्कार की दुसरं काही?
Follow us on

अकोला : कधी कुठे कोणती चर्चा सुरु होईल याचा काही पत्ता नाही. या चर्चेतून एखादी बातमी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरते आणि नंतर लोकं त्याची शहानिशा करण्यासाठी संबंधित स्थळी पोहोचतात. अकोल्यात देखील तसाच काहीसा प्रकार समोर आलाय. अकोल्यातील (Akola) महादेवाच्या मंदिरात पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येत गर्दी झाली. रविवारी संध्याकाळी अचानक याबाबत चर्चा झाली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत महादेवाच्या मंदिरात गर्दी बघायला मिळाली. दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.

महादेवाच्या मंदिरात पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याचे समजताच रविवारी संध्याकाळच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे अजूनही मंदिरासमोर भक्त गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ही अफवा असल्याची चर्चा काही नागरिकांमध्ये आहे.

महादेवाच्या पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची बातमी समोर आल्यानंतर ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मंदिरात महिलांची तोबा गर्दी झाली. काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाने पिंडीवरील तिसरा डोळाच उघडल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखीनच भर पडली.

हे सुद्धा वाचा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नेमकी प्रतिक्रिया काय?

दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शरद वानखडे यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. कुणीतरी जाणून-बुजून खोडसाळपणा केला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये, असा सल्लाही यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, एका महिलेने या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. “आता नवीनच मंदिर स्थापन झालंय. संध्याकाळी दररोज आरती होते. इथे काही महिला आरती करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा अचानक कुणाचं तरी लक्ष गेलं. त्यांनी पाहिलं की एकदम अद्भूत असा चमत्कार घडला. पिंडीला मस्त डोळे आले. सर्व महिलांनी घटना पाहिली”, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली.