टेन्शन वाढणार… आता पेट्रोल 170 रुपये, डिझेल 150 रुपये होणार, बड्या नेत्याचं भाकीत!

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यानुसार पुढील दीड महिन्यात पेट्रोल 170 तर डिझेल 150 रुपये होईल. सध्याच्या इंधन दरवाढ आणि तुटवड्याने नागरिक, शेतकरी त्रस्त आहेत. सरकार इंधन तुटवडा नाकारत असले तरी आरसी बुक तपासणी हे वास्तव दर्शवते.

टेन्शन वाढणार... आता पेट्रोल 170 रुपये, डिझेल 150 रुपये होणार, बड्या नेत्याचं भाकीत!
पेट्रोल-डिझेलबद्दल बड्या नेत्याचं भाकीत काय ?
| Updated on: May 28, 2026 | 10:45 AM

गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात इंधन दरवाढ होत आहे. रोजच सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे दर वाढत असले तरी राज्याच्या अनेक भागात इंधन मिळत नाहीये. राज्यातील अनेक पेट्रोलपंप इंधना अभावी बंद झाले आहेत. अनेक पेट्रोल पंपांनी तर पेट्रोल संपलं… डिझेल संपल्याचे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे इंधनाअभावी नागरिकांची दैना झाली आहे. शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यातच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक भाकीत केलं आहे. राज्यात येत्या दीड महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दीडशे रुपयांच्या वर जाणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

पाच- सात नाही, तर पुढच्या दीड महिन्यामध्ये 150 रुपयेपर्यंत डिझेल झालेल दिसेल. 170 रुपये पेट्रोल झालेले दिसेल, असा दावा करतानाच ज्या पद्धतीने देश चालवला जात आहे, हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे. देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणार आहे. याला मारण्यासाठी ते सरकार आलेलं आहे, असा हल्लाच मनोज जरांगे यांनी चढवला आहे.

मग आरसी बुक का पाहत आहेत?

इंधन तुटवडा नाही असे सरकार सांगत असेल, केंद्रीय मंत्र्यांकडून तुटवडा नाही असं सांगितलं जात असेल, भाजपकडून असं सांगितलं जात असेल… तर आरसी बुक पाहून डिझेल का दिलं जात आहे? शेतकरी ट्रॅक्टर कशासाठी वापरतो? त्याला आरसी बुक पाहून जर इंधन देत असतील तर याचा अर्थ तुटवडा आहे, हे मान्य करा. भविष्यात ते होणार आहे. एअर इंडियाची विमान सेवा कमी झाली आहे. अनेक विमान सेवा नागपूरवरूनही रद्द होतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

आयोग भाजपचे दलाल

एसआयआरवर योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे… त्याला सोडून द्या. त्यावर टिप्पणी करणार नाही. मात्र निवडणूक आयोग हे भाजपचे दलाल आहे, हे लपलेलं नाही. हे आजही सांगतोय आणि उद्याही सांगत राहणार आहे. काय कारवाई करायची आहे, ते त्यांनी सांगावे. जो धिंगाणा सुरू आहे, जे बंगालमध्ये झालं, जे बिहारमध्ये झालं… या दोन्ही राज्यात यांची सत्ता येऊ शकत नव्हती. एसआयआरच्या नावावर मतदान मिळवण्याचे काम यांनी केलं. विरोधकांचे मतदान कमी करून सगळे इलेक्शन जिंकत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

तेव्हा तुम्ही बोलू नका

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची घोषणा करणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. जरांगे पाटील वारंवार आंदोलन करत आहेत. पण त्यांना वाटण्याच्या अक्षदा लावण्याचा काम झालं आहे. जीआर काढायचा, पण अंमलबजावणी करायची नाही, असं सुरू आहे. जरांगे त्यांचा विषय घेऊन लढत आहेत. आमचा विषय घेऊन आम्ही लढू. आम्ही ओबीसींसाठी काही मागू तेव्हा तुम्ही काही बोलू नका? आणि ते मराठ्यांसाठी काही मागत असतील तर आम्ही तेव्हा बोलणार नाही. सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. लूट केलेली आहे? कोणाला द्यायला काही शिल्लक राहिलेल्या नाही, असंही ते म्हणाले.

ओपनमध्ये ओबीसीला रिझर्वेशमध्ये संधी राहिलेली नाही. 85% लोकांना 50 टक्के आरक्षण आणि 15 टक्के लोकांना 50 टक्के आरक्षणाचा जीआर काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आमच्या हातात काय भेटणार आणि त्यांच्या हातात काय मिळणार आहे? असा सवाल त्यांनी केला.

अंतिम निर्णय नाही

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कर्नाटकातील घडामोडींवर हायकमांडचं लक्ष आहे. जी काही परिस्थिती असेल, त्यावर नेतृत्व निर्णय घेईल. नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे, यात काही अंतिम नाही. सिद्धरमय्या यांचा योग्य तो सन्मान केला जाणार आहे. अंतिम निर्णय झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us