महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी पोलिसांची एक मागणी, गोपाळ बदनेच्या अडचणीत वाढ होणार
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेला ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सरकारी वकिलांनी आत्महत्येपूर्वीच्या सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा उल्लेख असल्याने ७ दिवसांची मागणी केली.

साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टराच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर आरोपी गोपाळ बदने याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी सरकारी वकील सुचिता वायकर-बाबर यांनी हा गुन्हा अत्यंत गंभीर असून ही घटना महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणारी आहे, असे कोर्टात म्हटले. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईट नोट ही डाईंग डिक्लेरेशन असल्याने ती सत्य मानली जाते. मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नाही. मोबाईल जप्त करणे आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी तसेच सुसाईड नोटमध्ये केलेल्या बलात्काराच्या उल्लेखाची चौकशी करण्यासाठी आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.
याप्रकरणी लैंगिक अत्याचाराच्या घटनेची माहिती केवळ दोन व्यक्तींनाच होती, त्यापैकी एक डॉक्टर महिला आता हयात नाही. त्यामुळे गुन्हा झालेली ठिकाणे, पद्धत या सगळ्यांचा तपास करणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
पोलिसांच्या ७ दिवसांच्या कोठडीला विरोध
आरोपी गोपाळ बदनेच्या वतीने ॲड. राहुल धायगुडे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना बदनेला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. यात त्याचा कोणताही दोष नसल्याचे नमूद केले. मृत तरुणीने बदनेवर केलेले बलात्काराचे आरोप अस्पष्ट आहेत. आरोपी बदनेला यात बळीचा बकरा बनवण्यात आले आहे, असे आरोपीचा वकिलांनी म्हटले आहे. त्यांनी पोलिसांच्या ७ दिवसांच्या कोठडीला विरोध केला.
या सुसाईड नोटमधील अत्याचार आणि छळवणुकीचा उल्लेख हा प्रशांत बनकर याच्या संदर्भात आहे. कारण त्या दोघांमध्ये लग्न करण्यावरून चार महिन्यांपासून वाद सुरू होते. पीडित महिला डॉक्टर आरोपी प्रशांत बनकरच्या घरी राहत होती, पण तिने लॉजवर राहण्याचा निर्णय का घेतला? तिला बाहेर जायला प्रवृत्त करण्यात आले होते का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. सुसाईड नोटच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बलात्कार झाला असेल तर त्याची वेळ, ठिकाण नोंदवता आले असते, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
आरोपींना कोठडीत घेऊन तपास करणे गरजेचे
या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गोपाळ बदने याला ७ दिवसांऐवजी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर दुसऱ्या आरोपी प्रशांत बनकर याला यापूर्वीच पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी तसेच मोबाईल, इतर पुरावे आणि आत्महत्येपूर्वी घडलेल्या घटनांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना आरोपींना कोठडीत घेऊन तपास करणे गरजेचे असल्याचे या सुनावणीतून स्पष्ट झाले.
