मोठी बातमी! महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे गटाने घेतला मोठा निर्णय; शरद पवारांना धक्का!

PMC Election : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे गटाने घेतला मोठा निर्णय; शरद पवारांना धक्का!
Sharad Pawar mva
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 28, 2025 | 6:05 PM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून राजकीय नेते बैठकांमध्ये व्यस्त आहेत. सध्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने युती आणि आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच आता पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. आज शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागावाटपासाठी बैठकीचे आयोजन केले होते, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या बैठकीकडे पाठ फिरवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी या नेत्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली. यावर संजय राऊत यांनी कोणाची वाट पाहू नका पुढे जा अशी सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सोबत लढण्याची निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन लागत नाहीत – संजय मोरे

आजच्या बैठकीबाबत बोलताना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी म्हटले की, ‘मागच्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते होते, मात्र ते कालपासून नॉट रिचेबल झाले. त्यांना फोन लावत होतो, त्यांचा फोन लागत नाही. काही नेते फोन उचलत नाहीत. काँग्रेसने आणि आम्ही निरोप दिला होता. त्यांच्या कुठल्याच नेत्याचा फोन लागत नाही, कुणाला विचारायचं हा प्रश्न आम्हाला पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता नाही असा आम्ही ठरवलं आणि बोलणी आम्ही दोघांनी सुरू केली. अंकुश काकडे ,विशाल तांबे ,बापू पठारे या सगळ्यांना फोन लावून झाले. त्यांचा काहीतरी वेगळा निर्णय असेल. आज आम्ही आणि काँग्रेसने एकत्रित बसून जागा वाटपाचं काम हाती घेतल आहे. इतके दिवस आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित होतो आता त्यांचा विचार बदलला असेल. आता ते नेते पुन्हा आले तरी तेवढा वेळ राहिला नाही. ते पुन्हा आले तर आता त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील.’

165 जागांची आमची यादी तयार आहे – अरविंद शिंदे

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले की, ‘आज सकाळपासून आम्ही निवडणुकीच्या बैठकीसाठी बसलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देखील निरोप दिले होते. ते दुपारी येणार होते पण अजून त्यांचे नेते आले नाहीत. तरीही काल ज्या जागा त्यांना ठेवल्या आहेत त्या आजही तशाच आहेत. आम्ही काल तिघे बसलो, आज ते का आले नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे. आजही आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. 165 जागांची आमची यादी तयार आहे. मी त्यांच्या सगळ्या नेत्यांना कॉल केला त्यांचे नेते फोन उचलत नाहीयेत. कुणी आलं कुणी नाही आलं तरी आमची तयारी आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात ताकदीने लढू. ही आघाडी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाची आहे पण आता काय होईल माहिती नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस परत येईल असं वाटत नाही.’