धक्कादायक ! मांजाने घेतला पोलिसाचा बळी, ड्युटी संपवून बाईकवरून घरी जाणाऱ्या अधिकाऱ्याचा गळा मांजाने चिरला
धोकादायक आणि धारदार मांजामुळे अनेक दुर्घटना, अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता हाच मांजा प्राणघातक ठरला आहे. एका मांजामुळे पोलिसाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली.

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : धोकादायक आणि धारदार मांजामुळे अनेक दुर्घटना, अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता हाच मांजा प्राणघातक ठरला आहे. एका मांजामुळे पोलिसाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. ड्युटी संपवून बाईकवरून घरी परत जात असताना पतंगाच्या मांजाने गळा चिरला गेल्याने पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. समीर सुरेश जाधव असे मृत पोलिस हवालदाराचे नाव असून याप्रकरण खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
ड्युटी संपवून घराच्या दिशेने निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. समीर जाधव वरळीतील बीडीडी चाळीत वास्तव्यास होते तर गोरेगावमधील दिंडोशी पोलिस ठाण्यात ड्युटी करत होते. रविवारी दुपारी काम संपवल्यानंतर जाधव त्यांच्या बाईकवरून घरी परत जात असतानाच वाकोला पुलावर त्यांच्यासमोर अचानक पतंगाचा एक मांजा आला. त्यातून वाचण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्या मांजाने त्यांचा गळा चिरला गेला. रक्त येत असल्याने ते स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होचे, मात्र तेवढ्यात ते बाईकवरून खाली पडून गंभीर जखमी झाले.
Mumbai, Maharashtra | Police constable Sameer Suresh Jadhav who was going home after duty, on his bike, died after his throat got slit by a kite string. Kherwadi Police registered the case and started further investigation: Mumbai Police pic.twitter.com/dijic9Mvuc
— ANI (@ANI) December 24, 2023
आजूबाजूच्या वाहनचालकांनी हा प्रकार पाहिला आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. खेरवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी समीर जाधव यांना तातडीने सायन रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली. जाधव यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. ते पोलिस दलात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर दिंडोशी पोलिस आणि जाधव यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. मात्र जाधव यांच्या दुर्दैवी, अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
