
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, त्यामुळे सध्या शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती समोर येत आहे, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, अमित शाह यांनी आश्वासन देखील दिलं होतं, फडणवीसांनी देखील याप्रकरणात लक्ष घातलं होतं. मात्र अमित शाह यांच्या आश्वासनानंतर देखील आणि निवडणुका संपल्या तरी भाजपमधील इनकमिंग सुरूच असल्यानं आता शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
डेंबिवलीमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावरून भाजप-शिवसेना शिंदे गट पुन्हा आमने-सामने आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उप तालुकाप्रमुख विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी थेट भाजपला इशाराच दिला आहे, फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्याकडून थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाच इशारा देण्यात आला आहे, तर आम्ही एकाच्या बदल्यात चार फोडू असा इशारा त्यानंतर भाजपच्या वतीनं संजय शिरसाट यांना देण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजपात भडका उडाला आहे. कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सदानंद खरवळ यांचा मुलगा अभिजित खरवळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उप तालुकाप्रमुख विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र या पक्षप्रवेशामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आले आहेत. या पक्षप्रवेशानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट
खरतर रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र फिरलं पाहिजे, पण त्यांना कल्याण, डोंबिवली याच्यापलीकडचं काही दिसतच नाही.तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, जरा महाराष्ट्रात फिरा थोडं, चांगलं काम करा. आमच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण हे प्रलोभनं देऊन कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.