काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, राहुल गांधींच्या निकटवर्तीय कुटुंबाचा भाजपात प्रवेश, कारणही समोर
हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याने हिंगोलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर असताना प्रज्ञा सातव यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (१८ डिसेंबर) मुंबईत विधानभवन सचिव जितेंद्र भोळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या विधान परिषद आमदारकीचा अधिकृत राजीनामा सोपवला होता. राजीनामा सादर केल्यानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते. प्रज्ञा सातव यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत असतानाही त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर भाषण केले. यावेळी त्यांनी प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला, यामागचे कारण सांगितले. हिंगोली हा जिल्हा अनेक वर्षांपासून विकासापासून काहीसा दूर राहिला आहे. स्व. राजीव सातव यांनी या जिल्ह्यासाठी मोठे स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पात हिंगोलीला अग्रस्थानी नेण्यासाठी प्रज्ञाताईंनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्याला गती मिळाली आहे, आता राजकीय पाठबळामुळे हा विकास अधिक वेगाने होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान राजीव सातव हे काँग्रेसचे अत्यंत प्रभावशाली नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. २०१४ च्या मोदी लाटेतही महाराष्ट्रातून निवडून आलेल्या दोन काँग्रेस खासदारांपैकी ते एक होते. अशा दिग्गज नेत्याच्या पत्नीने आणि स्वतः दोनदा आमदार राहिलेल्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये जाणे, हा काँग्रेससाठी हिंगोलीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
प्रज्ञा सातव यांचा अल्पपरिचय
डॉ. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी असून त्यांचा हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये शरद रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्या पहिल्यांदा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना संधी दिली आणि त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. सातव यांनी गेल्या दोन दशकांपासून राजीव सातव यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर काम केले आहे. गांधी घराण्याच्या विश्वासू कुटुंबातील सदस्य अशी ओळख असलेल्या प्रज्ञा सातव यांनी आता २०३० पर्यंतचा कार्यकाळ शिल्लक असताना आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
