सांगलीतील बोट दुर्घटनाग्रस्त ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकरांकडून दत्तक

सांगलीत महापुरातील बचावकार्यादरम्यान बोट दुर्घटना घडली, ते ब्रम्हनाळ गाव दत्तक घेण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे

सांगलीतील बोट दुर्घटनाग्रस्त ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकरांकडून दत्तक

सांगली : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगलीतील ब्रह्मनाळ (Bramhanal) गाव दत्तक घेतलं आहे. सांगलीत आलेल्या महापुराच्या वेळी बचावकार्यादरम्यान बोट उलटून 17 जणांना प्राण गमवावे लागले होते.

ब्रम्हनाळ हे 700 कुटुंब आणि 3500 लोकसंख्या असलेलं गाव आहे. ब्रम्हनाळ गावातील नागरिकांना एक महिन्याभराचं धान्य देऊ, असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे. गावातील घरांची पाहणी करुन मदत करणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली.

ब्रम्हनाळ गावातील पाणी ओसरल्यानंतर 25 तोळे सोन्याचे दागिने आणि पैसे आढळून आले होते. ब्रम्हनाळमधील (Bramhanal boat overturn) म्हसोबा कॉर्नर परिसरात दागिने आणि पैसे सापडले होते. सापडलेल्या वस्तूंमध्ये सोने, पैसे, एक मोबाईल आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात बचावकार्य करत असताना क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे ब्रम्हनाळमध्ये बोट उलटली होती आणि अनेक जण वाहून गेले. कोणाकडेही लाईफ जॅकेट नव्हतं. काही जणांना वाचवण्यात यश आलं, तर 17 जणांना प्राण गमवावे लागले. सरकारी मदत न पोहोचल्यामुळे या सर्वांना खाजगी बोटीतून वाचवलं जात होतं. पण बोट फांदीला अडकली आणि पलटी झाली.

महापुरानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्हा आता सावरत आहे. राज्यासह देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ येत आहे. सरकारकडूनही पीडितांना मदतीचं वाटप सुरु करण्यात आलंय. या नैसर्गिक संकटामध्ये ब्रम्हनाळच्या घटनेने सर्वांचंच हृदय हेलावून गेलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI