निवडणुकीत वंचितचं काय होणार? प्रकाश आंबेडकरांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले आमचे…

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी महायुती तसेच महाविकास आघाडीवरही टीका केली आहे.

निवडणुकीत वंचितचं काय होणार? प्रकाश आंबेडकरांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले आमचे...
prakash ambedkar
Image Credit source: एक्स
| Updated on: Nov 27, 2025 | 6:43 PM

Prakash Ambedkar On Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अनेक नेते सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. या पक्षांतराच्या घटनांमुळे महायुतीत बेबनाव पाहायला मिळतोय. दुसरीकडे महाविकास आघाडीचे पक्षदेखील अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. असे असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या भविष्यावाणीन राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत वंचितचं नेमकं काय होणार? याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

वंचितबाबत केली मोठी भविष्यवाणी

सध्या महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपरिषदेची निवडणूक चालू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलिंडर हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. एकंदरित आमच्या पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती चांगली आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नाहीत. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट हे महाविकास आघाडीत एकत्र आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी हे तिन्ही पक्ष दबाव टाकू शकतात. पण त्यासाठी ते एकत्र का येऊ शकत नाहीत, हाच मोठा सवाल आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या मदतीवरूनही सरकारला घेरले. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31 हजार कोटी रुपये वाटण्यात आले, असं सांगण्यात आले. आतापर्यंत शेतकऱ्यांना जो काही मोबदला मिळाला आहे, तो विम्याचा मोबदला आहे. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या विमा काढलेला आहे. त्याच विम्याचा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे, असे म्हणत सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आमदार-खासदारांनी हे पैसे पळवल्याचे समजावे

सरकारने ३१ हजार कोटी रुपये वाटप झाले आहे का? याचा खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. सत्ताधाऱ्यांनी 31 हजार कोटी रुपये पळवले आहेत, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. सरकारमधील कार्यकर्ते, आमदार-खासदारांनी हे पैसे पळवल्याचे समजावे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीन अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.