
माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत पक्ष सोडण्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच भाजप प्रवेशाचे संकेतही दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.
प्रकाश महाजन यांना मनसे सोडण्यामागे नेमके काय कारण होते याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी अत्यंत स्पष्ट उत्तर दिले. मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे आणि याच कारणामुळे आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
प्रकाश महाजन यांनी यावेळी आपण संघ विचारांचे असल्याचे ठामपणे सांगितले. “मी संघ विचारांचा माणूस आहे आणि शाखेत देखील जातो,” असे विधान करत त्यांनी आपल्या भूमिकेवर जोर दिला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना मी राज ठाकरेंना घाबरत नाही, असे देखील म्हटले.
प्रकाश महाजन यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या भेटीबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. “माझं वैयक्तिक काम होतं आणि मुख्यमंत्र्यांसोबत आमचे पारिवारिक संबंध आहेत, त्यामुळे मी भेटीसाठी आलो होतो,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी, “आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत तर आहोतच, आम्ही कधी ते लपवलं नाही,” असे ठामपणे सांगितले. या विधानामुळे महाजन आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
यावेळी प्रकाश महाजन यांनी आपला मुलगा वैभव महाजन यांच्या राजकीय वाटचालीबद्दलही आनंद व्यक्त केला. “वैभव भाजपमध्ये खूप आनंदी आहे. पाल्याचा आनंद पाहायला आलो आहे. वैभव कमळाकडे गेला, त्यामुळे मी खूप खूश आहे,” असे सांगत त्यांनी भाजपबद्दलची आपली सकारात्मकता दर्शवली.
यादरम्यान प्रकाश महाजन यांनी भाजपबद्दल जुने आणि सकारात्मक नात्याबद्दलही भाष्य केले. भाजप हारल्यावर आम्हाला वाईट वाटतं, नातं जुनं आहे, असेही त्यांनी म्हटले. यावेळी स्वतःच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाचे जवळजवळ निश्चित संकेत दिले. मी कधीच भाजपविरोधात काम केलेलं नाही, त्यामुळे आता भाजपनं ठरवायचं आहे” असे सूचक विधान प्रकाश महाजन यांनी केले. या वक्तव्यावरून त्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे.