तर जरांगेंजवळ एक मिनिटही बसलो नसतो… प्रसाद लाड यांनी का केलं असं विधान?

प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले असते तर त्यांच्यासोबत बसलो नसतो असे विधान केले. मुख्यमंत्र्यांशी मतभेद दूर करण्याची जबाबदारी घेतल्याचे लाड म्हणाले. जरांगे पाटलांची भाषाशैली गावंढळ असली तरी त्यात प्रेम आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असून, जरांगे पाटलांनी उन्हात बसू नये, अशी विनंतीही लाड यांनी केली.

तर जरांगेंजवळ एक मिनिटही बसलो नसतो... प्रसाद लाड यांनी का केलं असं विधान?
Manoj Jarange and Prasad Lad
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 30, 2026 | 2:30 PM

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून कालपासून सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ काल अंतरवली सराटीत गेलं होतं. त्यांच्यासोबत आमदार प्रसाद लाडही होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांची मनधरणी केली. पण जरांगे काही ऐकले नाहीत. यावेळी जरांगे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीतच मुद्दे मांडले. नेहमी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे जरांगे काल नरमाईच्या भूमिकेत होते. याबाबत जेव्हा प्रसाद लाड यांना विचारण्यात आलं, तेव्हा जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं असतं तर मी जरांगे जवळ एक मिनिटही बसलो नसतो, असं प्रसाद लाड म्हणाले.

आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना जरांगे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत असल्याबद्दल विचारलं. त्यावर लाड यांनी थेट उत्तर दिलं. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं असतं तर मी तिथं एक मिनिटही बसलो नसतो. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री आणि जरांगे पाटलांमधील मतभेद आणि मनभेद दूर करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यांची भाषाशैली गावंढळ पद्धतीची आहे. मी आता कोकणी बोलायला गेलो तर तुम्ही म्हणणार शिव्या दिल्या. गावाकडची भाषा मनाला लाऊन घ्यायची नसते. त्या भाषेतच प्रेम असते. मनोज जरांगे रागाने बोलतात आणि प्रेम देखील करतात. जरांगे आणि आमचं प्रेम तसंच राहूद्या. त्यात मिठाचा खडा टाकू नका, असा सल्ला प्रसाद लाड यांनी दिला.

मनोज दादा, भाऊ म्हणून विनंती…

मराठा समाजासह सर्वच समाज घटकांना न्याय मिळावा हीच इच्छा आहे. जरांगे पाटलांनी रखरखत्या उन्हात उपोषणाला बसू नये, अशी भाऊ म्हणून त्यांना विनंती आहे. मनोज दादा, उन्हात बसू नका ही हात जोडून विनंती आहे. सरकारला जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जरांगेंचं समाधान होईल

यावेळी त्यांनी शिंदे समिती आणि उपसमितीवरही भाष्य केलं. शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे. विखे पाटलांच्या नेतृत्वात उपसमिती पुढेही काम करणार आहे. शिंदे समितीत आणखी एक सेवा निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची आमची तयारी आहे, असं सांगतानाच जरांगे पाटलांचे निश्चित समाधान होईल आणि समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर कोर्टात आव्हान मिळेल

सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील सेतू म्हणून आम्ही काम करतोय. आज सरकार म्हणून विखे पाटील त्यांना भेटले आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या. सातारा गॅझेट लागू केलं तर हैदराबाद गॅझेटला कोर्टात आव्हान मिळेल, असं वकिलांचं म्हणणं आहे. आम्ही 98 लाख नोंदीबाबत सविस्तर आढावा घेणार आहोत. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणं हे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याचा प्रयत्न करू. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या निश्चितपणे पूर्णत्वाला जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us