कट्टर विरोधक एकत्र, पृथ्वीबाबा-विलासकाका उंडाळकर यांची दिलजमाई, सातारा काँग्रेसची ताकद वाढणार

काँग्रेस पक्षात असून देखील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री विलास काका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दिलजमाई झाली आहे.

कट्टर विरोधक एकत्र, पृथ्वीबाबा-विलासकाका उंडाळकर यांची दिलजमाई, सातारा काँग्रेसची ताकद वाढणार

कराड : काँग्रेस पक्षात असून देखील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री विलास काका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दिलजमाई झाली असून विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील हे काँग्रेसमध्ये सक्रिय होणार आहेत. (Prithviraj Chavan met Vilas kaka Undalkar)

गेल्या काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलास उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यामधला टोकाच्या संघर्षाचा आता अंत झाला असल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील आता दरी कमी झाली आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकर यांचे पुत्र अ‌ॅड. उदयसिंह पाटील यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये उदयसिंह पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रिय करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

कराड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच विधासभेचे आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी कराड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले. अशा प्रकारे कराड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत तीनच आमदार पाहिले आहेत.

राजकीय संघर्षातून चव्हाण आणि उंडाळकर गटात नेहमीच मोठी चुरस पहायला मिळाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे आई-वडील खासदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्या काळातील राजकीय संघर्षातून विलासराव उंडाळकर यांनी बाजूला होऊन त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्या माध्यमातून त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली तर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत आणि उंडाळकर राज्यात आपला स्थान टिकवून होते.

मागील काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उंडाळकरांची त्यांच्या सातारा येथील ‘राजविलास’ या बंगल्यातवर जाऊन भेट घेतली. पृथ्वीबाबांनी पहिल्यांदाच उंडाळकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर नुकतीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री थोरात, आमदार चव्हाण आणि अ‌ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये अॅड. पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रिय करण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील आणि विलासकाका उंडाळकर यांच्या उपस्थितीत कराडला पुढील आठवड्यात मोठा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत जिल्ह्यात वाढलेली ताकद काँग्रेस दाखवून देणार आहे.

(Prithviraj Chavan met Vilas kaka Undalkar)

संबंधित बातम्या

पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!

Published On - 3:51 pm, Mon, 2 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI