Shaktipeeth Express Highway : ‘देवाच्या नावाखाली कोणी….’, शिंदे गटाच्या खासदाराचा सरकारला घरचा आहेर
Shaktipeeth Express Highway : नागपूरला थेट गोव्याशी जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. पण या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल असं सांगितलय.

कोल्हापूर, सांगली या भागात शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शक्तीपीठ महामार्गाद्वारे नागपूरला थेट गोव्याला जोडण्याची योजना आहे. या प्रस्तावित महामार्गासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. 800 पेक्षा जास्त किलोमीटरचा हा महामार्ग असून एकूण 12 जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन कराव लागणार असून त्यात शेतकऱ्यांच सर्वाधिक नुकसान होणार आहे. कारण शेतकऱ्यांना त्यांच्या हातातील पिकांवर पाणी सोडावं लागेल. म्हणून शेतकऱ्यांकडून या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा तीच पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी या महामार्गाच्या विरोधात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारने आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
“शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटूच. पण संसदेमध्ये सुद्धा याबाबत आवाज उठवू” अशी खासदार धैर्यशील माने यांनी सांगलीत आंदोलकांना ग्वाही दिली. “देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही” धैर्यशील माने यांच्याकडून सरकारला घरचा आहेर. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला समोर काँग्रेस आणि सामाजिक संघटनेने आंदोलन केले.
नागपूर- गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गा विरोधात आंदोलन सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृध्दी महामार्ग हा गेमचेंजर…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2024
एकनाथ शिंदे यांना मोर्चाद्वारे जाब विचारणार
नागपूर गोवा शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन केले. जिल्ह्यातील आमदार खासदारांना शक्ती पीठ महामार्ग रद्द करण्यासाठी निवेदन देणार. शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती नको महामार्ग रद्द करा. एकनाथ शिंदे यांच्या ट्विट नंतरही कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोधच आहे. महामार्गाचे फेर सर्वेक्षण झालं, तरीही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाऊ देणार नाही. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया. शक्तीपीठ महामार्ग रद्दच करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 25 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोर्चाद्वारे जाब विचारणार. महामार्ग विरोधी कृती समितीचे गिरीश फोंडे यांचा इशारा.
