आधी प्रेग्नन्सी टेस्ट करून या… सुट्टीवरून हॉस्टेलमध्ये आलेल्या विद्यार्थिनींसाठी फर्मान ! कुठे घडला प्रकरा ?
Pregnancy Test in Pune Hostel : ही (प्रेग्नन्सी) टेस्ट केली नाही तर हॉस्टेलमध्ये प्रवेश करू दिला जात नाही, असं विद्यार्थिनींच म्हणणं आहे. हे अतिशय लाजिरवाणं आहे. सुट्टीवरून हॉस्टेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलीला हे करावं लागतं. यामुळे अनेकांना मानसिक त्रासही होत असल्याचं काही विद्यार्थनिंनी सांगितलं.

पुण्यातील एक सरकारी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अनेक विद्यार्थिंनीनी असा आरोप केला आहे की घरी सुट्टी घालवून हॉस्टेलवर परत आल्यानंतर त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्यापूर्वीच त्यांना ही टेस्ट करावी लागते. अनेक विद्यार्थिनींनी हॉस्टेल मॅनेजमेंटवर हा आरोप लावला आहे. हे हॉस्टेल महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामार्फत चालवले जाते. मात्र,प्रेग्नन्सी चाचणी अनिवार्य करण्याचा कोणताही नियम नाही आणि ती केली जाऊ नये असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
पुणे जिल्ह्यातील एका सरकारी आदिवासी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अनेक विद्यार्थिनींनी असा आरोप लावला आहे की घरी सुट्टी घालवून जेव्हा त्या हॉस्टेलवर येतात तेव्हा त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात येते. त्यासाठी त्यांना एक किट देण्यात येतो. तो घेऊन सरकारी रुग्णालयात जावं लागतं, तिथे त्यांची टेस्ट केली जाते. त्यानंतर डॉक्टरांकडून प्रेग्नन्सीचा निगेटीव्ह रिपोर्ट मिळाल्यावर कॉलेजमध्ये फॉर्म जमा करावा लागतो. हे सगळे सोपस्कार झाल्यानंतरच त्या विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळतो असं बीबीसी हिंदीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
अतिशय लाजिरवाणी गोष्ट
रिपोर्टनुसार, एका विद्यार्थिनीने सांगितलं की जर एखाद्या मुलीने ही (प्रेग्नन्सी) टेस्ट केली नाही तर तिला हॉस्टेलमध्ये प्रवेशच मिळत नाही. हे अतिशय लाजिरवाणं असल्याचं मत अनेक विद्यार्थिनीनी व्यक्त केलं आहे. सुट्टीवरून आल्यावर एकूण एक विद्यार्थिनीला ही प्रेग्नन्सी टेस्ट करावी लागते. एका विद्यार्थिनीच्या सांगण्यानुसार, तिने आत्तापर्यंत अगणित वेळा ही टेस्ट केली आहे. यामुळे अनेकींना मानसिक ताणही सहन करावा लागतो, असं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. त्यांना लाजिरवाणं वाटतं, लोकं आपल्याकडे साशंक नजरेने पाहतात. यांचं लग्न झालं नाहीये, तरीही यांची प्रेग्नन्सी टेस्ट का केली जाते, असा प्रश्न लोकांच्या चेहऱ्यावर दिसतो, असं एकीन सांगितलं.
एवढंच नव्हे तर पुण्यातील एका आश्रम शाळेकडूनही अशीच तक्रार समोर आली आहे. रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, महाराष्ट्रातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना शिक्षित करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आश्रम शाळा चालवल्या जातात. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागाने वसतिगृहे देखील उघडली आहेत. पण, यापैकी अनेक वसतिगृहांमध्ये, महिला विद्यार्थ्यांसाठी प्रेग्नन्सी टेस्ट करणं अनिवार्य आहे.
पालकांना करावा लागतो खर्च
काही पालकांनी सांगितलं की विद्यार्थिनींना एक किट दिला जातो, ज्याद्वारे लघवीची तपासणी केली जाते. त्याचा जो ( पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह ) रिझल्ट येतो, फॉर्मवर तो लिहीला जातो. त्या चाचण्यांचा खर्च पालकांना उचलावा लागतो आणि प्रत्येक चाचणीची किंमत 150-200 रुपये असतो, असं काही पालकांनी सांगितलं.
या संपूर्ण प्रकरणी महाराष्ट्राच्या आदिवासी विकास यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशी कोणतीही चाचणी घेऊ नये असे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी, सप्टेंबर 2025 मध्ये, पुण्यातील एका वसतिगृहात प्रेग्नन्सी टेस्ट घेतली गेल्याची माहिती समोर आली होती. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत ही प्रथा थांबवण्याचे आदेश दिले.
