Pune Rave Party : काल पोलिसांची भेट, आज अंगावर वकिली कोट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे ॲक्शन मोडमध्ये!

रोहिणी खडसे यांनी आपले पती प्रांजल खेवलकर यांना वाचवण्यासाठी अंगावर वकिली कोट चढवला आहे. आज त्या पुण्यातल्या न्यायालयात हजर होत्या.

Pune Rave Party : काल पोलिसांची भेट, आज अंगावर वकिली कोट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे ॲक्शन मोडमध्ये!
rohini khadse
| Updated on: Jul 29, 2025 | 4:50 PM

Pune Rave Party : राज्यात सध्या पुण्यातील कथित रेव्ह पार्टीची सगळीकडे चर्चा आहे. या पार्टीत गांजासदृश पदार्थ, दारुच्या बॉटल्स सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आले आहे. आता आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी अंगावर वकिलीचा कोट चढवला आहे. त्या सुनावणीदरम्यान, पुणे न्यायालयात वकिलाचा कोट घालून हजर होत्या.

पतीसाठी अंगावर चढवला वकिली कोट

पुण्यातील खराडी येथील रेव्हा पार्टी प्रकरणी प्रांजवल खेवलकर यांच्यासह इतर सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सोपवण्यात आली होती. ही कोठडी आता संपली आहे. त्यामुळे आज या सर्व आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात रोहिणी खडसे यादेखील दिसल्या. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे आज न्यायालयात हजर होत्या. खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्या खुद्द एक वकील आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यादेखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून दिसल्या. त्यामुळे आता नेमके काय होणार? प्रांजल खेवलकर तसेच इतर आरोपींची सुटका होणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

अगोदर घेतली होती पुणे पोलिसांची भेट

याआधी न्यायालयात येण्याआधी रोहिणी खडसे यांनी 28 जुलै रोजी पुणे पोलिसांची भेट घेतली होती. रात्री 8 वाजता त्या पोलीस आयुक्तालयात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत, याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर आता आज रोहिणी खडसे थेट न्यायालयात वकील म्हणून उपस्थित झाल्या आहेत.

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या जावयाला अडकवण्यात येत आहे, असा दावा खडसेंनी केलाय.