भाजीपाल्याचे दर कडाडले; अनेक भाज्या शंभरी पार, पावसाचा फटका
पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यासह विभागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, तोडणीही थांबली आहे. याचा परिणाम म्हणजे भाज्यांची आवक घटल्यानं दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यासह विभागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, तोडणीही थांबली आहे. याचा परिणाम म्हणजे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे. दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली असल्याने बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात इतर वेळी राज्य आणि परराज्यातून दररोज 90 ते 100 ट्रक भाज्यांची आवक होते. मात्र, सध्या ही आवक 10 ते 20 ट्रकने कमी झाली आहे. भाज्यांची आवक कमी आहेच, शिवाय भिजलेल्या आणि कमी प्रतिच्या मालाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगेलेच वाढले आहेत.
पावसाचा फटका
भाजीपाला उत्पादनाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे, पुणे जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अतिमुसळधार पाऊस झाला होता, या पावसामुळे फळं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर पावसानं उघडीप दिली, पुन्हा एकदा आवक सुरू झाली, मात्र आता पावसानं हजेरी लावल्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, तोडणीही थांबली आहे. याचा परिणाम म्हणजे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे. भाजीपाल्याची आवक घटली आहे, मात्र दुसरीकडे मागणी जास्त असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
भाज्यांचे किरकोळ बाजारातील किलोचे दर…
गवार १२० ते १३०
शेवगा १०० ते १२०
मटार १२० ते १६०
दोडका १०० ते १२०
भेंडी १०० ते १२०
सिमला मिरची १२० ते १३०
मेथीची जुडी ७० रुपयांना….
बाजारात मेथीच्या जुडीची ६० ते ७० रुपयांना विक्री करण्यात आली आहे आतापर्यंतचा हा उच्चांकी दर आहे.
गृहिणींचं बजेट कोलमडणार?
आधीच महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे, वाढत्या महागाईचा सामना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यातच आता भाजीपाल्यांचे दर देखील वाढले आहेत. भाज्यांच्या दरांमध्ये तब्बल वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे, याचा फटका गृहिणींना बसण्याची शक्यता आहे.
