
माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरून उचलबांगडी करत क्रीडा खाते बहाल करण्यात आले. अजितदादांचे विश्वासू आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना शेतकी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच्या या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. कृषी खात्याला नवीन चेहरा मिळाला. आता खात्यात लवकरच काही मोठे बदल होतील अशी अपेक्षी होती. पण नवीन कृषीमंत्र्यांनी सुद्धा नमनालाच घडाभर तेल ओतले. त्यांनीही या खात्याच्या कारकिर्दीची सुरुवात वादाचा नारळ फोडूनच केली. त्यांच्या वादग्रस्त विधानाने आता हे खातं पुन्हा वादाच्याच वलयात हरवणार का? असा सवाल करण्यात येत आहे. विरोधकांनी मग भरणे मामांना आमचे तुमच्या खात्यावर बारीक लक्ष असल्याचे ठणकावले.
काय म्हणाले दत्ता भरणे मामा?
नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात एक वक्तव्य केले. त्यावरून वाद उफाळला आहे. कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात. पण वाकडं काम करून पुन्हा ते नियमात बसवतो, त्याची माणसं, लोक नोंद ठेवतात, असे वक्तव्य भरणे मामांनी केले आहे. महसूल संदर्भातील एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. भरणेंनी केलेल्या या वक्तव्यामुळं वादाची चिन्हं आहेत. वाकडं काम केल्यावर ते नियमात कसं बसवता येतं? असा खोचक सवाल विरोधक त्यांना विचारत आहेत. तर आता कृषी खात्यात वाकडं काम होणार आहे की काय? असा चिमटा ही काहींनी त्यांना काढला आहे.
वाकडं काम केलं तर सोडणार नाही
भरणे यांच्या वक्तव्याने नवीन वाद उफाळला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली. “तुमचं हे पहिलचं वक्तव्य आहे आणि ते इतकं घातक आहे. तुम्ही काय म्हणलात की वाकडी कामं सुद्धा आपल्याला करावी लागतात. अनेक नेत्यांनी वेडवाकडी कामं करून राज्याची तिजोरी वेडवाकडी केलेली आहे. उलट अशा नेत्यांची मालमत्ता, संपत्ती बघीतली तर ती ताडासारखी सरळ वाढताना दिसते. भरणे मामांना सांगतो की तुम्हाला वाकड्यात काम करण्यासाठी हे पद दिलेलं नाही. तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही या सर्व गोष्टी मान्य करू. त्यामुळे भरणे मामांना इतकंच सांगतो की, अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडं बघत आहे. तुम्ही बोलून गेलात वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही.” असा खणखणीत इशारा पवारांनी त्यांना दिला.