Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! 5 जुलैचाही मुहूर्त हुकणार? आता इन्कम टॅक्सचा खोडा, शेतकर्यांना कधी दिलासा?
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून तारीख पे तारीख देण्यात येत आहे. 30 जूनचा मुहूर्त हुकल्यावर 5 जुलै म्हणजे आजपासून लाभ मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सरकारने कालच नमनाला घडाभर तेल वाहून शेतकऱ्यांचा हिरमोड केला.

Farmer Loan Waiver Scheme Income Tax : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून तारीख पे तारीख सुरू आहे. 30 जून 2026 रोजीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन सरकारने फारपूर्वीच दिले होते. पण ही तारीख आली नि गेली. राज्यपालांची स्वाक्षरी बाकी असल्याचे निमित्त साधून 5 जुलै ही तारीख देण्यात आली. तर काल सरकारच्या नवीन धोरणामुळे कर्जमाफी लांबणीवर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 जाहीर केली आहे. आता या महिन्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार का? याविषयीच शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.
आयकर भरणाऱ्या शतेकऱ्यांची यादी मागवली
इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकर्यांची यादी सरकारने मागवली आहे. त्यामुळे कर्जमाफी लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकर्यांची माहिती आल्यानंतर शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर कर्जमाफी या महिन्यात तरी मिळणार का? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
सरकारने कर्जमाफीसाठी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवल्याने कर्जमाफी काहीशी लांबणीवर जाण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वर्तवली आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा होताच शेतकर्यांना कर्जमाफी होईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात भरणे बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026
कर्जमुक्तीचे महत्त्वाचे निकष
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान अल्पमुदत पीककर्ज माफी
30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2025 अखेर थकीत कर्जावर 2 लाखांची कर्जमाफी
2019 मधील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना 50 हजारांचा प्रोत्साहनपर लाभ
प्रोत्साहनपर लाभ कुणाला?
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार. 2022-23, 2023-24, 2024-25 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत लाभ मिळेल. कर्ज परतफेड रक्कम कमी असल्यास निकषाप्रमाणे लाभ मिळेल.
कर्जमाफीसाठी कोण अपात्र?
राज्य सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25 हजारांपेक्षा जास्त वेतन, निवृत्ती वेतन प्राप्त शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, आयकर दाते, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी, 25 हजारांपेक्षा जास्त वेतन प्राप्त सहकारी संस्थांचे पदाधिकारी
मंत्रिगट समितीची देखरेख
शेतकरी कर्जमाफी योजना ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची गरज नाही. आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगट उपसमिती योजनेवर देखरेख करत आहे.