
नृत्यांगना गौतमी पाटील हिची तरुणांमध्ये क्रेझ आहे. तिच्या नृत्यावर अनेक जण थिरकतात. पण एका प्रकरणात आता तिच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गौतमी पाटील हिच्या कारने 30 सप्टेंबर रोजी नवले पुलावर एका रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि गौतमी पुन्हा चर्चेत आली. हायहोल्टेड ड्रामा घडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. आता या कार चालकाचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे.
वैद्यकीय अहवालात काय?
गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पोलिसांना ड्राइवरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे. संतोष दिनकर उभे असं गौतमी पाटील हिच्या कारच्या चालकाचं नाव आहे. ससून रुग्णालयाने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला. त्यात संतोष उभे याने मद्यसेवन केलं नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मग आता हा अपघात नेमका घडला कसा? यात चूक तरी कुणाची असे सवाल समोर येत आहे. हा अपघात झाल्यानंतर क्रेन आणणे आणि कार नेणे याप्रकारामुळे संशय वाढला होता.
ससूनच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये काय?
ससून रुग्णालयाने संतोष उभे या वाहनचालकाचे वैद्यकीय नमुने घेतले आणि त्याविषयीचा अहवाल आता समोर आला आहे. त्यानुसार, चालकाच्या श्वासामध्ये मद्याचा कोणताही वास येत नव्हता. चालकाच्या डोळ्याच्या बाहुल्या सुद्धा बदलल्या नाहीत. त्या नेहमीप्रमाणेच होत्या. ड्रायव्हरचे बोलणे स्थिर होते. डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे सदर व्यक्तीने मद्याचे सेवन केले नव्हते. विश्लेषणात्मक तपासणीसाठी ड्रायव्हरचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
गौतमी पाटीलशी संपर्क नाही
दरम्यान या अपघातानंतर सिंहगड रोड पोलिसांनी गौतमी पाटील हिला बाजू मांडण्यासाठी बोलावले होते. त्यासाठी लेखी कळवण्यात आले. पोलिसांच्या नोटीसची दखल गौतमीने घेतली. पण ती अद्याप पोलिसांसमोर आलेली नाही. मात्र गेल्या 4 दिवसांपासून गौतमी पाटील हिने पोलिसांशी संपर्क केला नसल्याचे अथवा कोणतीही माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज रिक्षा चालकांच्या कुटुंबियांना दाखवले. दरम्यान रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी याप्रकरणी पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे.