India vs Pakistan : ना हस्तांदोलन, ना ड्रामा, पाकिस्तान, पराभवासाठी सज्ज राहा
ICC Women World Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये सपाटून मार खाल्ल्याने पाकिस्तान क्रिकेट जगतात नाराजीचा सूर आहे. त्यात आज होणाऱ्या महिला सामन्यात भारताचे पारडे जड असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जीव टांगणीला लागला आहे.

India and Pakistan women match today : आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) टीम इंडियाने पाकला अस्मान दाखवले. पण भारतीय खेळाडूंनी ना पाक संघाशी हस्तांदोलन केले ना त्यांच्या मंत्र्यांच्या हस्ते आशिया चषकाची ट्रॉफी घेतली. हा प्रयोग पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. आज आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत दोन्ही संघ आमने-सामने येत आहे. भारतीय महिला संघाचे पारडे जड मानण्यात येत आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हुडहुडी भरली आहे. कारण महिला टीम इंडिया सुद्धा हस्तांदोलन करणार नाही. कोलंबोतील या सामन्याकडे उभ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
हस्तांदोलन नाही, ड्रामा नाही
आशिया कप 2025 नंतर 7 दिवसांनी आज रविवारी 5 ऑक्टोबर 2025 रोजी भारत आणि पाकिस्तानचा महिला संघ विजयासाठी लढेल. आतापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय संघाचे पारडे जड मानण्यात येत आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये हा सामना होईल. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशात आशिया कपमध्ये सामना रंगला. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि दहशतवादासोबत तडजोड होणार नसल्याचा थेट संदेश खेळाच्या माध्यमातून पोहचवला. तर एका वृत्तानुसार, BCCI ने भारतीय टीमला पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करण्याचे निर्देश अगोदरच दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाकची जागतिक मंचावर पुन्हा नाचक्की होत आहे.
भारतीय महिला संघाचे पारडे जड
भारतीय महिला संघाची कामगिरी सध्या सरस आणि उजवी मानल्या जात आहे. सना फातिमा हिच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाची हाराकिरी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुरूष विश्वचषकात भारताने पाकिस्तानला सर्व 8 सामन्यात पराभवाचा रास्ता दाखवला होता. तर महिला विश्वचषकातही चित्र काही वेगळं नाही. भारती महिला संघाने पाकिस्तानला एकदिवसीय विश्वचषकातील सर्व 4 सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. भारत आणि पाकमध्ये आतापर्यंत एकूण 11 एकदिवसीय सामने खेळण्यात आले. यासर्वांमध्ये भारतीय महिला संघाने विजयाची नोंद केली आहे. विश्वचषक 2022 मध्ये भारतीय टीमने पाकिस्तानचा 107 धावांनी मोठा पराभव केला.
हे खेळाडू दाखवणार कमाल
टीम इंडियातील महिला खेळाडूंना पुन्हा एकदा चमकण्याची मोठी संधी आहे. या सामन्याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. श्रीलंकेविरोधातील सामन्यात महिला खेळाडूंना खास जलवा दाखवता आला नाही. खासकरून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांना एकदम उजवी कामगिरी बजावता न आल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले होते. तर जेमिमा रॉड्रिग्सला खातेही उघडता आले नाही. आता आघाडीच्या खेळाडूंना आज मागच्या सामन्यांमधील सर्व उणीवा भरून काढून पाकिस्तानला करारा जबाब देण्याची आयती संधी मिळाली आहे.
