मी महाराष्ट्र सांभाळला सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना टोला

| Updated on: Sep 25, 2022 | 7:35 PM

मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता. एक चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकता का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना केला.

मी महाराष्ट्र सांभाळला सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना टोला
देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना टोला
Image Credit source: t v 9
Follow us on

पुणे : पालकमंत्र्यांची यादी काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. त्यात सहा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जबाबदारी देण्यात आली. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. सहा जिल्हे कसं सांभाळणार असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करत असतात. ते ऐकायचं आणि त्यावर आनंद घ्यायचा. त्यांच्या विनोदावर आम्हाला रिएक्शन का विचारता. ते बेताल बोलतात. बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्याएवढी वेळ नाही.

नाना पटोले यांचं राज्य आलंच तर त्यांना तीन-चार जिल्हे ठेवायचे असले, तर मी त्यांना ते कसे मॅनेज करायचे ते सांगेन. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात, असंही फडणवीस म्हणाले.

एका चिठ्ठीचा पुरावा दाखवा

मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता. एक चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकता का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना केला. काहीतरी मनात येईल,ते बोलता. अडीच वर्षे सत्तेवर होतात. त्या काळात त्यांनी काहीच केलं नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

अडीच वर्षात केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायचं काम यांनी केलं. आता मनात येईल ते बोलता. साधी चिठ्ठी तर दाखवा की, मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात मंजूर झाला होता नि मग तो दुसरीकडं गेला. रोज बोलायचं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं यानं महाराष्ट्र कधीचं पुढं जाणार नाही. आम्ही हिमतीनं महाराष्ट्रात गुंववणूक आणली, यापुढंही आणून दाखवू, असा सज्जड दम फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

देशद्रोहाचा गुन्हा लागला पाहिजे

पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रात आणि भारतात ही घोषणा खपवून घेतली जाणार नाही. अशा घोषणा देणाऱ्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा लागला पाहिजे, अशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पीएफआयचा तपास पुरावे गोळा करून करण्यात आलाय. यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी काम केलंय. मागच्या काळात मी गृहमंत्री असताना पीएफआयच्या अॅक्टिव्हीटीज मार्क करत होतो. केरळसारख्या राज्यानं पीएफआयवर बंदी टाकावी, अशी मागणी केली होती.

जे काही होत त्यावर राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष असतं. हे लक्ष विचलीत होणार नाही. जे देशविरोधी कारवाया करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.