पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Pimpri Chinchwad by election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी झाल्याचं स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी होत असल्याचं चित्र आहे. या सगळ्या घाडमोडींदरम्यान दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला. अर्ज दाखल करायला आलेल्या एका अपक्ष उमेदवार डिपॉझिट जमा करण्यासाठी थेट दहा हजारांची चिल्लर घेऊन आलेला बघायला मिळाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना चिल्लर मोजायला बराच वेळ लागला.