‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहिणाऱ्या तरुणीला पुण्यातील कॉलेजमधून काढलं, आता करतेय ‘ही’ विनंती
भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव सुरू असताना या तरुणीने सोशल मीडियावर 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी पोस्ट लिहिली होती. तिची पोस्ट व्हायरल होताच तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई झाली.

काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली होती. या ऑपरेशन सिंदूरनंतर पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पाकिस्तानच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला बेड्या ठोकल्या होत्या. इतकंच नाही तर संबंधित तरुणीला सिंहगड कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं. आता या तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेत महाविद्यालयाने तिच्यावर केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे “मला सत्र परीक्षेला बसू द्या”, अशी विनंती तिने केली आहे.
19 वर्षीय खतीजा शहाबुद्दीन शेखने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणारी पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तिची ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिला अटक करत तिच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 152, 196, 197, 299, 352, 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर सिंहगड कॉलेजमधूनही तिला काढून टाकण्यात आलं होतं. खतीजा ही सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंग विनाअनुदानित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.
पाकिस्तानच्या समर्थनात पोस्ट लिहिल्यामुळे कॉलेजमधून काढून टाकल्यानंतर महाविद्यालयाचा हा निर्णय मनमानी आणि बेकायदेशीर आहे, असा दावा तिने केला आहे. याविरोधात तिने तिने वकील फरहाना शाह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला काढून टाकण्याचा महाविद्यालयाचा निर्णय मनमानी आणि बेकायदा ठरवून रद्द करावा, अशी मागणी तिने केली आहे. तसंच महाविद्यालयात पुन्हा सामावून घ्यावं आणि 24 मे पासून सुरू होणाऱ्या सत्र परीक्षेला बसू देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या तरुणीने केली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. याअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याकडून हवाई हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील राज्यांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. हवाई हल्ल्यांद्वारे पाकिस्तानमधील काही एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.