शरद पवार गटाला अजितदादांचा धोबीपछाड; कुणाच्या पारड्यात किती जागा?

| Updated on: Nov 06, 2023 | 4:05 PM

Maharashtra Gram Panchayat Election 2023 Results : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागतो आहे. भाजपने सहाशे पार जात महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आपलं वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर अजित पवार गट भारी पडल्याचं चित्र आहे.

शरद पवार गटाला अजितदादांचा धोबीपछाड; कुणाच्या पारड्यात किती जागा?
Follow us on

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बारामती, पुणे | 06 ऑक्टोबर 2023 : मागची साडे पाच दशकं शरद पवार हे नाव महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळाचा केंद्रबिंदू राहिलेलं आहे. शरद पवार यांची एक सभा म्हणजे विजयाची हमी, असं राजकीय जाणकार सांगतात. पण आता शरद पवार यांचं गाव असलेल्या बारामतीच वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. त्याचं कारण ठरलं, ग्रामपंचायत निवडणुका… या निवडणुकांमुळे बारामतीत अजित पवार यांचा होल्ड कायम असल्याचं समोर आलं आहे. तसंच राज्यातही शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार हे वरचढ ठरल्याचं आजच्या ग्रामपंचायत निकालांमधून दिसतं आहे.

दादांचा साहेबांना धोबीपछाड

अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर महाराष्ट्रात पहिलीच निवडणूक झाली. या निवडणुकीत शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळाला. यात अजित पवार यांनी शरद पवारांना धोबीपछाड दिल्याचं दिसलं. बारामती, पुणे जिल्ह्यासह राज्यभरात अजित पवार गटाचा दबदबा कायम असल्याचं चित्र दिसलं.

बारामतीत अजितदादांचं वर्चस्व

बारामतीतील 32 ग्राम पंचायतींचा निकाल समोर आला आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाने 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 2 जागांवर विजय झाला आहे

काटेवाडीचा निकाल

बारामती तालुक्यातील काटेवाडी हे शरद पवार आणि कुटुंबाचं मूळगाव. इथं अजित पवार गट विरूद्ध भाजप असा सामना रंगला. त्यामुळे काटेवाडीचा गड अजित पवारांनी राखला आहे. काटेवाडी ग्रामपंचायत पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात आली आहे. अजित पवार पुरस्कृत जय भवानी माता पॕनल विजयी झालं आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीतील 16 पैकी 14 जागा अजित पवार गटाने जिंकल्या. तर एक जागेवर भाजप विजयी झाला आहे. काटेवाडीत एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. बारामतीतील काटेवाडी ग्रामपंचायत निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं.

राज्यातील आतापर्यंतचा निकाल

2 हजार 359 ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यापैकी 1 हजार 864 जागांचा निकाल समोर आला आहे. भाजपला 602 जागांवर विजय मिळाला आहे. अजित पवार गटाला 315 जागांवर यश मिळालं आहे. शिंदे गट 226 जागांवर विजयी झाला आहे. 164 काँग्रेसला विजय मिळाल आहे. तर शरद पवार गटाने 155 जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गट 103 जागांवर विजयी झाला आहे.