IMD Rain Alert : तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?

हवामान खात्यानुसार, पुढील तीन दिवसानंतर राज्यात पावसाचे प्रमाण घटणार आहे, ज्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भात आधीच 50% पेक्षा अधिक पावसाची तूट आहे. सप्टेंबरमध्येही पाऊस कमी राहण्याची शक्यता असल्याने पाणी व चारा टंचाई निर्माण होऊ शकते.

IMD Rain Alert : तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
maharashtra monsoon
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 2:12 PM

लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : गेल्या तीन महिन्यापासून राज्यात पावसाची म्हणावी तशी हजेरी लागलेली नाही. शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये. राज्यात काही ठिकाणी पावसाने दांडी मारली, काही ठिकाणी अल्पप्रमाणात पाऊस झाला. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली. पावसाचं हे दुष्टचक्र राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता हवामान खात्याचा नवा अंदाज आला आहे. पुढचे तीन दिवस राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात राहील. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे राज्यावरचं आणि खासकरून बळीराजावरचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या तीन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात तसेच पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तीन दिवसानंतर राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती एसडी सानप यांनी दिली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये 50 टक्क्याहून अधिक पावसाची तूट निर्माण झाली आहे, असंही सानप यांनी सांगितलं.

सप्टेंबरनंतर पाऊस कमीच

राज्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असणार आहे. येणाऱ्या सप्टेंबर महिन्यातही राज्यात पावसाचं प्रमाण कमीच असणार आहे, असंही सानप यांनी स्पष्ट केलं. सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिल्यास राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारा टंचाईलाही राज्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मासोळी धरणात 15 टक्के पाणी

दरम्यान, अर्धा पावसाळा संपून गेला तरी म्हणावा तसा पाऊस न झाल्याने परभणी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरासह अनेक गावांची तहान भागावणाऱ्या मासोळी धारणात 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात जर पाऊस झाला नाही तर मोठं जलसंकट या भागात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा शेतीवर देखील मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याच आवाहन केलं जात आहे.

इंद्रायणी भाताच्या पिकाला बहर

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा इंद्रायणी भाताच्या उत्पादनासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र, इंद्रायणी वाणासोबतच मावळ तालुक्यात विविध प्रकारच्या भाताच्या वाणांचीही लागवड केली जाते. चालू खरीप हंगामात भातपिकासाठी झालेला समाधानकारक पाऊस पोषक ठरल्याने मावळातील भातपिके जोमदार आली आहेत. सध्या तालुक्यातील विविध गावांमध्ये भातपिकातील बेनणीच्या कामाला वेग आला असून, शेतातील अनावश्यक गवत काढून टाकण्यासाठी महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात राबताना दिसत आहेत. बेनणीमुळे भातपिकाला आवश्यक अन्नद्रव्ये व सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होत असल्याने पिकाची वाढ चांगली होण्यास हातभार लागतो. यंदा पावसाची साथ आणि पोषक वातावरणामुळे भातपिकाची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे इंद्रायणीसह इतर भातवाणांचेही उत्पादन चांगले येण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.भाताचे उत्पादन वाढल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us