NCP News: राष्ट्रवादी विलिनीकरणावर सर्वात मोठा खुलासा! गोविंदबागेत दादांची बैठक, तारीखही ठरलेली
एकीकडे दोन्ही गटाकडून सध्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, असं सांगितलं जात असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे.

विक्रम वरे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी:
Yugendra Pawar On NCP Merjer: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या बैठका यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे दोन्ही गटाकडून सध्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, असं सांगितलं जात असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे.
विलीकरण होणारचं होतं…’
“विलीनीकरण हे होणारच होतं. आज नाहीतर बऱ्याच महिन्यांपासून ही चर्चा आणि बातम्या आपण ऐकत आलो आहे. अजित दादांची याबाबत मिटींग झाली होती. येथे गोविंद बागेतसुद्धा दादांची मीटिंग झाली. तेव्हा तुम्ही सगळे पत्रकार पण होता. सगळ ठरलेलं, साधारण 12 फेब्रुवारीला दादांनीच ती घोषणा केली असती. अचानक दादा आपल्याला सोडून निघून गेले, त्यामुळे तो विषय मागे राहिला. विलीनीकरण होणार होतं ही दादांची इच्छा होती. पवार साहेबांसोबत पुन्हा एकदा एकत्र यायचं होते,” असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
‘विमान अपघाताची चौकशी व्हावी..’
यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही महत्त्वाचे विधान केले. मी स्वतः विमान क्षेत्रातला तज्ञ नाही. पायलट नाही किंवा त्याचा अभ्यास मी केला नाही. चौकशी झालीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका राहिली आहे. दादा ज्यावेळी वारले होते त्याच वेळेस आम्ही बारामती पोलीस स्टेशन या ठिकाणी बसलो होतो. रोहित पवार पण या विषयावर अनेक दिवसांपासून बोलत आले आहेत. सगळ्यांची इच्छा आहे चौकशी झाली पाहिजे आणि ती लवकर झाली पाहिजे. अहवाल आहे तो सगळ्यांसमोर आला पाहिजे जाहीर केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, “गोकुळ संदर्भात जे काही चाललं आहे ते चुकीचेच आहे. तिथे जी कोल्हापूरची लोक आहेत त्यांनी स्पष्ट बंटी पाटलांच्या बाजूने आपला निकाल दिला आहे. तिथे जे नवीन संचालक नियुक्त करतात किंवा तो निर्णय घेतात हे चुकीचे आहे, लोकशाहीसाठी फार घातक आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरची जी स्वाभिमानी जनता आहे ती बंटी पाटलांसाठी रस्त्यावर उतरली आहे,” असं म्हणत युगेंद्र पवार यांनी गोकुळवरुनही आपली भूमिका स्पष्ट केली.