‘बदला घेण्यासाठी लढत असतील तर…’, अमोल कोल्हे यांचा आढळराव पाटलांना सवाल

"निवडणुकीला सामोर जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हेही स्पष्ट होतं. त्यांचं विधान पाहिलं तर त्यांना 2019 चा बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशीर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे", असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

बदला घेण्यासाठी लढत असतील तर..., अमोल कोल्हे यांचा आढळराव पाटलांना सवाल
| Updated on: Mar 23, 2024 | 8:41 PM

शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. या जागेवर राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असल्याने महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा या मतदारसंघावर दावा आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांना आपण जिंकूनच येऊ अशी खात्री आहे. पण ही जागा महायुतीत राष्ट्रवादीसाठी सुटण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आढळराव पाटील हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या या निर्णयावर खासदार अमोल कोल्हे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीय.

“2019 चा बदला घेण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर माझा प्रश्न आहे… एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्या माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे? हा प्रश्न माझ्या मनात येतो”, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांना टोला लगावला.

‘मायबाप जनता सुज्ञ आहे’

“दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोर जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हेही स्पष्ट होतं. त्यांचं विधान पाहिलं तर त्यांना 2019 चा बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशीर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

‘महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा निवडणुकीत नक्की दिसेल’

यावेळी अमोल कोल्हे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीसोबत जाण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “कुणी महायुतीत जाणं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. पण या पद्धतीने जे प्रकार सुरु आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय. अब की बार 400 पार म्हणणं असताना जेमतेम ते 200 चा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्त्वाची राहणार आहे. एकीकडे शिवसेना फोडून झाली. राष्ट्रवादी फोडून झाली तरी सुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी सुद्धा परिस्थिती भाजपला फेव्हरेबल अशी नाही, असं मत अमोल कोल्हे यांनी मांडलं. महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल”, असं देखील अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.