Nitin Gadkari : ..पण याची कोणी कधी बातमी बनवली नाही, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन नितीन गडकरींनी बोलून दाखवली मनातली खंत
Nitin Gadkari : केंद्रीय वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना मनातली खंत बोलून दाखवली. यासाठी त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे चं उदहारण दिलं.

राज्य सरकारने बांधलेल्या रस्त्यांसंदर्भात काही समस्या असली तरी मलाच जबाबदार धरतात असं केंद्रीय वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवारी म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. त्यांनी यावेळी 27 वर्षांपूर्वी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे चं उदहारण दिलं. अजून पर्यंत या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही असा दावा नितीन गडकरी यांनी केला. पण याची कधी बातमी बनवली नाही अशी खंत नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली. “मी 27 वर्षांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधला. आजपर्यंत त्या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. तो रस्ता उत्तम कंडीशनमध्ये आहे. पण यासंबंधीची बातमी कधी प्रसिद्ध झाली नाही” असं नितीन गडकरी म्हणाले.
“जे रस्ते राज्य सरकारने बांधले आहेत, त्यासाठी सुद्धा मला जबाबदार धरतात” असं नितीन गडकरी म्हणाले. “माझ्या कार्यकाळात वन खात्याकडून परवानगी मिळाली नाही, त्यामुळे मी मिसिंग लिंक बांधू शकलो नाही” असं नितीन गडकरी बोलले. “राज्य सरकारने तो मिसिंग लिंक बांधला आहे. त्या संदर्भात समस्या निर्माण झाली, तेव्हा सोशल मीडियावर मला टार्गेट करण्यात आलं. खरंतर तो प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यांनी अमलबजावणी केली आहे” असं नितीन गडकरी म्हणाले.
अंतर 20 ते 30 मिनिटाने कमी होते
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक वाहतुकीसाठी 1 मे रोजी खुला झाला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून जाणारा हा रस्ता 13 किलोमीटरचा बायपास आहे. दोन टनेल आणि केबल ब्रिजने मिसिंग लिंक बनवला आहे. 5.7 किलोमीटरचं अंतर कमी करण्यासाठी हा मिसिंग लिंक बांधण्यात आला आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवासातील अंतर 20 ते 30 मिनिटाने कमी होते.
मिसिंग लिकंवर किती हजार कोटींचा खर्च?
मागच्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ता बंद करावा लागलेला. या दुर्घटनेमुळे मिसिंग लिंक रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यंत्रणेला या मार्गावरुन वाहतूक थांबवून दुसऱ्या मार्गावर वळवावी लागली. रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या नऊ आठवड्यात ही समस्या उदभवली. तब्बल 6,695 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे.