महावितरणच्या थकबाकीमुक्त योजनेला पुण्यातल्या शेतकऱ्यांचा ‘लाख’मोलाचा प्रतिसाद, 284 कोटींचं वीजबिल माफ

| Updated on: Aug 31, 2021 | 5:23 PM

महावितरणने 'थकबाकीमुक्त' योजना जाहीर केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. एकूण 1 लाख 8 हजार 130 शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेच्या माध्यमातून वीजबिलात सूट मिळवली आहे.

महावितरणच्या थकबाकीमुक्त योजनेला पुण्यातल्या शेतकऱ्यांचा लाखमोलाचा प्रतिसाद, 284 कोटींचं वीजबिल माफ
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे : कोरोनाकाळात (Corona) वीज ग्राहकांकडे (Electricity Consumer) वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्याचं समोर आलं आहे. वारंवार विनंती आणि सूचना करूनही ही थकबाकीचा भरणा होत नसल्याचं चित्र आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून (MSEB) विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार महावितरणने ‘थकबाकीमुक्त’ योजना जाहीर केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. एकूण 1 लाख 8 हजार 130 शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेच्या माध्यमातून वीजबिलात सूट मिळवली आहे. (One lakh farmers in Pune district have waived crores of electricity bills by participating in MSEB arrears free scheme)

28 हजार शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त

योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी 84 कोटी 68 लाख आणि चालू वीजबिलांचे 91 कोटी 60 लाख रुपयांचा भरणा केला आहे. मूळ बिलातली सूट तसेच विलंब आकार आणि व्याजातील सूट अशी मिळून शेतकऱ्यांचे 284 कोटी 37 लाख रुपये माफ झाले आहेत. विशेष म्हणजे या योजनेतून 28 हजार 578 शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांनी चालू वीजबिलासह एकूण थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरली आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना सूट आणि संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

जिल्ह्यातल्या 3 लाख शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी

गेल्यावर्षी मार्च महिन्यात महावितरणने कृषीपंप वीज धोरण 2020 च्या अंमलबजावणीला सुरूवात केली. या धोरणातल्या योजनेप्रमाणे पुणे जिल्ह्यातल्या एकूण 3 लाख 11 हजार 154 शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्के सूट देण्यात येत आहे. शिल्लक थकबाकीपैकी 50 टक्के थकबाकी येत्या मार्च 2022 पर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे.

वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल साडेआठ हजार कोटींच्या घरात

सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय खालावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतल्या ग्राहक आणि कृषिपंपांच्या वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल साडेआठ हजार कोटींच्या घरात गेली होती. त्यामुळे थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभागी नाहीत किंवा चालू वीजबिलांचा भरणा केलेला नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

थकबाकीमुक्त योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या वीजबिलांचे किमान चालू वीजबिलांचा भरणा करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणकडून गावागावात जाऊन वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींची सूट

कृषिपंप वीज धोरणामधून पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12 लाख 44 हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीमध्ये एकूण 2 हजार 643 कोटी रुपयांची महावितरणकडून विलंब आकार आणि व्याजातून सूट देण्यात आली होती. त्यानंतर या शेतकऱ्यांकडे सुधारित 8 हजार 175 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातही बरीचशी थकबाकी शेतकऱ्यांनी भरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे महावितरणचा थकबाकीचा आकडा कमी होत जात आहे.

इतर बातम्या :

धनंजय मुंडे-प्रीतम मुंडे एकाच मंचावर, पण एकमेकांकडे ना पाहिलं, ना बोलले, पाहा फोटो

थेट तहसील कार्यालयाचाच लिलाव! प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

Palghar | मच्छीमारांनी जाळं टाकलं, 157 घोळ मासे हाती लागल्यानं नशीब पालटलं, सव्वा कोटींची कमाई