पुण्यातील धरणांमध्ये मे महिन्यातच जलसाठा वाढला, पाणी कपातीचे संकट टळणार
Pune Rani: पुणे जिल्ह्यात मे महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. पुणे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस होत असतो. परंतु मे महिन्यातच पाऊस झाल्यामुळे धरणसाठा वाढला आहे.

पुण्यात मे महिन्यात चांगलाच पाऊस झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे अन् जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. नेहमी जून महिन्याच्या अखेरीस पुण्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढतो. परंतु यंदा मे महिन्यातच धरणांमधील पाणी वाढल्यामुळे पुणे शहरातील पाणी कपातीचे संकट टळणार आहे.
पुण्यात मंगळवारीसुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे शहर, जिल्हा आणि घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणे आहेत. त्यात खडकवासला, पानशेत, वडीवळे आणि आंध्रा धरणाचा समावेश आहे. या चारही धरणांमध्ये पाणी वाढले आहे.
धरणसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात
पुणे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस होत असतो. प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनानंतरच धरणांमध्ये पाणीसाठ्यास सुरुवात होते. सर्वसाधरणपणे जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा मे महिन्यातच पुण्यातील चारही धरणांच्या परिसरात १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे धरणांमध्ये २६ मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर कालव्यातून दिवसभर पाणी सोडले तरी पाणीसाठा ५.७० टीएमसी आहे. त्यामुळे या पुढे धरणात पाणी वाढत जाणार आहे.
पुण्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस
पुणे राज्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी लगेच आज उद्या पेरणीची घाई करू नये, असा सल्ला ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. राज्यात साधारण 3 जूननंतर मान्सूनचा पहिला टप्पा संपणार आहे. त्यानंतरच म्हणजे साधारण जूनच्या पहिल्या आठवडाच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला.
