चंद्रकांत दादांच्या कामाचं ऑडिट भोवलं, राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधीच कापला, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
पुणे महापालिकेत महायुतीतील अंतर्गत वाद उफाळला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या ऑडिट मागणीमुळे भाजपने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा (सुनील टिंगरे, अमोल बालवडकर) निधी कापला. यामुळे राष्ट्रवादीत तीव्र नाराजी असून, त्यांनी याला राजकीय सूडबुद्धी म्हटले आहे. निधी परत करण्याची तयारी दर्शवत, राष्ट्रवादीने भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली असून, कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा दिला आहे.

पुण्यात महायुतीतील धुसफूस अखेर समोर आली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करण्याची मागणी केली म्हणून भाजपने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी कापला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी नाराजी पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी निधी परत करण्याची तयारी सुरू केल्याने महापालिकेत भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शकयता आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे. जा दुपारी महापालिकेत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे आणि अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरील आहे. राजकीय सुडबुद्धीने हा निधी कापण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून हा अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशारा भाजपला दिला आहे. राष्ट्रवादीने आज दुपारी 3 वाजता महापालिकेत सर्व नगरसेवकांची तातडीची बैठकही बोलावली आहे. बैठकीत काय भूमिका घ्यायची? यावर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी ही बैठक बोलावली आहे. आमदार चेतन तुपे, महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि दीपक मानकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा प्रकार टाकला आहे.
शिंदेंकडे तक्रार करणार
या सर्व प्रकरणावर सुनील टिंगरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी शून्य केल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. आज दुपारी आम्ही नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढे काय करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, या प्रकरणाची आम्ही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. आम्ही विरोधात प्रश्न विचारले म्हणून दहशत निर्माण करण्यासाठी हा निधी शून्य करण्यात आला आहे, असा आरोप टिंगरे यांनी केला आहे.
कोर्टात जाणार
आमचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ. जे काही कायदेशीर मार्ग आहेत, त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. सभागृह नेत्यांना वाटत की विरोधात बोलू नये. मात्र आम्ही आमच्या पद्धतीने लढत राहूॉ, असंही टिंगरे यांनी स्पष्ट केलं.
फक्त सही केली म्हणून…
यावेळी टिंगरे यांनी भाजवर गंभीर आरोपही केला. राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अमोल बालवाडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर मी अनुमोदक म्हणून सही केली होती. याप्रकरणात माझा काही संबंध नसल्याचंही मी चंद्रकांत पाटील यांना सांगितलं होतं. फक्त सही केली म्हणून निधी शून्य केला असले तर हा संविधानाचा अपमान आहे. ही तर हिटलरशाही आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.
त्या कामात गौडबंगाल आहे का?
तुमचा आमच्यावर राजकीय आकस असू शकतो. मात्र आमच्या जनतेच्या प्रश्नच काय? हा निधी मला येणार नव्हता, जनतेच्या कामासाठी येणार होता. आम्ही जर चौकशी करण्याची मागणी केली तर थेट निधी कापला जात असेल तर त्या कामात काय गौडबंगाल आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
भाजपला बहुमताचा अहंकार
यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी निवडून आलेला नगरसेवक असूनही मला शून्य निधी दिला. माझ्या कुठल्याच बजेटच प्रशासकीय वर्गीकरण झालं नाही. माझ्या एकाही कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. हे सत्ताधारी भाजप करत आहे. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न हे करत आहेत. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, असा प्रकार भारतीय जनता पार्टीचे नेते करत आहेत. एकेकाळी मी पण भारतीय जनता पार्टीचं काम केलं आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. हे दाखवतात राम पण यांच्या वागणुकीमध्ये रावण आहे. यांना बहुमताचा अहंकार झाला आहे, अशी टीका बालवडकर यांनी केली.