Pune Metro : मेट्रोसंदर्भात पुणेकरांनी अजित पवार यांच्याकडे केलेल्या मागणी मान्य, काय झाला बदल
Pune Metro : पुणे शहरातील मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मेट्रोसंदर्भातील एक, एक समस्या पुढे येत आहेत. त्यावर मार्गही काढला जात आहे. आता अजित पवार यांच्यासमोर मांडलेली समस्या सुटली आहे.
पुणे | 14 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या एक, एक सुविधा मिळत आहे. १ ऑगस्टपासून पुणे शहरातील मेट्रोचे दोन आणखी मार्ग सुरु झाले. यामुळे मेट्रो प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्याच आठवड्यात सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या दोन मार्गांचा वापर अनेक पुणेकरांनी केला. पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर पहिल्याच आठवड्यात 3 लाख 2 हजार 904 प्रवाश्यांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. या दरम्यान मेट्रो प्रवाससंदर्भातील काही समस्या पुढे आल्या. लोकांनी त्या अजित पवार यांच्यासमोर मांडल्या अन् त्यातील महत्वाची समस्या सुटली.
काय समस्या मांडल्या
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी चांदणी चौकातील पुलाच्या उद्गाटन कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोमधील प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते वनाज मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करताना अजित पवार यांनी अनेक लोकांशी चर्चा केली. यावेळी मेट्रोपर्यंत येण्यासाठी बसेसची सुविधा नाही, स्वत:च्या वाहनांने आल्यास वाहनतळ नाही, मेट्रो सकाळी सात वाजता सुरु होते, त्यामुळे महाविद्यालयात जाणाऱ्या अडचण होते, अशा समस्या मांडल्या.
काय झाला बदल
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांनी महत्वाची मागणी मान्य झाली आहे. मेट्रो सकाळी सात ऐवजी आता सहा वाजता सुरु होणार आहे. तसेच रात्री १० ऐवजी रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे पुणेकर शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच सिंहगड एक्स्प्रेसने जाणाऱ्या लोकांची सुविधा होणार आहे. प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कन क्विन या गाड्या यामुळे मेट्रो लवकर सुरु होणार असल्यामुळे पकडता येणार आहे.
अजित पवार यांनी केल्या सूचना
मेट्रो लवकर सुरु करण्याची मागणी पुणेकरांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मेट्रो सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर मेट्रोमध्ये बदल केला गेला.