नावात बरंच काही आहे! सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर ते बटाट्या मारूती, पुणेकरांनी देवांना अशी नावं का दिली हे माहितीय का?

पुणेकर आपल्या चोखंदळ स्वभावामुळे जसे ओळखले जातात तसेच ते आपल्या सर्जनशीलतेसाठीही ओळखले जातात. याचंच एक उदाहरण घ्यायचं झालंच तर पुण्यातल्या देवांची आणि देवळांची नावं. पुणेकरांनी आपल्या देवांना आणि मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावं ठेवली आहेत.

नावात बरंच काही आहे! सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर ते बटाट्या मारूती, पुणेकरांनी देवांना अशी नावं का दिली हे माहितीय का?

पुणे : नावात काय आहे? असा प्रश्न जगभरात विचारला जातो. पण पुण्यात नाही. कारण पुण्यात नावात बरंच काही आहे. ‘पुणे तिथे काय उणे?’, असं आपण म्हणतो ते काही उगाच नाही. पुणेकर आपल्या चोखंदळ स्वभावामुळे जसे ओळखले जातात तसेच ते आपल्या सर्जनशीलतेसाठीही ओळखले जातात. याचंच एक उदाहरण घ्यायचं झालंच तर पुण्यातल्या देवांची आणि देवळांची नावं. पुणेकरांनी आपल्या देवांना आणि मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावं ठेवली आहेत. ही नावं दुसऱ्या कुठल्या शहरात असती तर त्याची एवढी चर्चा झाली नसती, पण पुण्याची बातच न्यारी आहे. (Punekars have given abandoned names to their gods and temples)

नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पुण्याचा लौकिक वाढला. पुणे विस्तारत गेलं. वेगवेगळ्या प्रदेशातली लोक पुण्यात येऊन स्थिरावली. पुणे व्यापाराचं एक महत्वाचं केंद्र बनलं. वस्ती वाढल्यानं सहाजिकच इथं वेगवेगळ्या देवांची मंदिरं आणि देवस्थानंही उभी राहू लागली. या मंदिरांची आणि देवांची नावं त्या कालानुसार ठेवण्यात आली किंवा सरावाने ती पडली. पण आजच्या काळात ही नावं काहीशी वेगळी वाटतात. या नावांचा इतिहास समाजावून घेतला तर पुण्याच्या समृद्ध इतिहासाची पानं उलगडल्याशिवाय रहात नाहीत.

पुण्यातल्या मारूती मंदिरांची रंजक कथा

पुण्यात सर्वाधिक मंदिरं ही मारूतीची असावीत. म्हणूनच मारूती मंदिरांच्या नावात वैविध्य जाणवतं. पुण्यातल्या मारूतीच्या प्रत्येक नावामागे काहीतरी अर्थ आणि कथा दडली आहे. शनिवारवाड्यासमोरच्या जागेत बटाट्याचा बाजार भरत असे. त्यामुळे या भागात असलेल्या मारुतीला ‘बटाट्या मारुती’ नाव पडलं. सराफा बाजारात असलेला मारूती झाला ‘सोन्या मारूती’. भिकारदास शेठजींच्या जागेत आहे म्हणून तो मारूती झाला ‘भिकारदास मारूती’. गुरूवारुपेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा होती. त्यामुळे इथल्या मारूतीला ‘रड्या मारूती’ म्हणतात.

… म्हणून नाव पडलं ‘डुल्या मारूती’

सध्याच्या केईएम रुग्णालय परिसरात पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. त्यामुळे इथल्या मारूतीला ‘उंटाड्या मारूती’ नाव पडलं. स्मशानाकडे अंत्ययात्रा घेऊन जाताना जिथे खांदापालट होत होती, त्याठिकाणच्या मारूतीला ‘विसावा मारूती’ म्हणतात. सर्वात रंजक कथा आहे डुल्या मारुतीची. दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडावे का, यासाठी मारूतीला कौल लावला, त्यावेळी मारूतीने मान डोलावून त्याला मान्यता दिली म्हणून त्याचं नाव ‘डुल्या मारूती’. यासोबत आणखी एक कथा अशी की, पानिपत इथं मराठा सैन्याची कत्तल झाली म्हणून तो थरथर कापत होता, डुलत होता म्हणून त्याचं नाव ‘डुल्या मारूती’ पडलं.

यासोबतच ‘लेंड्या मारूती’, ‘भांग्या मारूती’, ‘बंदिवान मारूती’, ‘तल्लीन मारूती’, ‘झेंड्या मारूती’, ‘पत्र्या मारूती’ अशी काही मारूतींची नावंही आहेत. हलवायांची दुकानं असणाऱ्या परिसरात एक मारूती मंदिर आहे. या मंदिरात मारूतीला जिलबीचा हार घातला जायचा म्हणून याचं नाव ‘जिलब्या मारूती’. फरासखाना परिसरात चाफेकर बंधुंनी मारूतीच्या साक्षीने गोफण क्लब सुरू केला त्यामुळे हा मारूती ‘गोफण्या मारूती’ झाला. यासोबतच पुण्यातली अनेक मारूती मंदिरं आपल्या नावासाठी प्रसिद्ध आहेत.

‘उपाशी विठोबा’ आणि ‘निवडुंग्या विठोबा’

‘उपाशी विठोबा’ हे एक आणखी वेगळं नाव असलेलं मंदिर. तीन पिढ्यांच्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा ‘उपाशी विठोबा’ म्हणून प्रसिद्ध झाला. यासोबतच ‘निवडुंग्या विठोबा’ असं एक मंदिरही नाना पेठेत आहे. एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाली म्हणून याचं नाव ‘निवडुंग्या विठोबा’ पडलं. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते म्हणून ‘पालखी विठोबा’.

‘सोट्या म्हसोबा’ची अख्यायिका, ‘दाढीवाला दत्त’

विजय टॉकिजजवळ ‘सोट्या म्हसोबा’चं मंदिर आहे. म्हसोबा ही रक्षक देवता आहे. त्यामुळे या देवाला नवस बोलला आणि तो पूर्ण झाला की, लाकडी सोटा वाहायची पद्धत होती. म्हणून या मंदिराचं नाव ‘सोट्या म्हसोबा’ पडलं. याशिवाय चोळखण आळीत असलेला ‘खणाळ्या म्हसोबा’, नागाचं मंदिर आणि त्यात दगडात कोरलेली नागाची मूर्ती यामुळे ‘दगडी नागोबा’ असंही नाव देण्यात आलं. मारूतीसोबतच पुण्यातल्या इतर देवस्थांनांची नावं आणि त्यामागच्या कथाही रंजक आहेत. नारायण पेठेत दत्तात्रय घाणेकर यांनी 1911 मध्ये एक दत्त मंदिर बांधलं. दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती, त्यामुळे या दत्त मंदिराचं नामकरण ‘दाढीवाला दत्त’असं झालं.

कसं पडलं खून्या ‘मुरलीधर नाव’?

पुण्यात गणपती मंदिरांची संख्याही मोठी आहे. पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड याच्या घराजवळ असलेला गणपती झाला ”गुंडाचा गणपती”. यासोबत मातीपासून केलेला ‘माती गणपती” आणि ”गुपचुप गणपती’ ही पुण्यात आहे. आणखी एक देवस्थान म्हणजे खून्या मुरलीधर. १७९७ मध्ये गद्रे सावकारांनी हे मंदिर बांधलं. त्याचा रक्षणासाठी अरब शिपाई ठेवले. त्यावेळी त्यांच्यात आणि इंग्रज सैन्यात लढाई झाली आणि त्यात ६० लोक मारले गेले. दुसरी कथा अशी की, चाफेकर बंधुनी रँड या ब्रिटीश अधिकाऱ्याचा खून केला. या कटातले द्रविड बंधू नंतर फितूर झाले आणि त्यांनी ब्रिटीशांना सगळी माहिती दिली. फितुरीची माहिती कळल्यावर द्रविड बंधुंचाही खून करण्यात आला. ते या मुरलीधर मंदिरासमोर रहात असत. त्यामुळे हा मुरलीधर झाला खून्या मुरलीधर.

यासोबतच, अशी अनेक नावं आणि देवळं पुण्यात पहायला मिळतात. पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही. देवांच्या नावावरूनही अनेकदा विनोद केले जातात. पण पुणेकरांनी आपल्या देवांना आणि देवळांना अगदी सोपी आणि सुटसुटीत नावं ठेवली आहे. ज्यामुळे त्या काळातला दैनंदिन व्यवहार्य सहजसोपा होत होता. या नावांचा मागोवा घेतला तर नावातच पुण्याचा बराचसा इतिहास दडला आहे हे लक्षात येतं.

संबंधित बातम्या :

सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही : अजित पवार

दाभोलकरांच्या हत्येला 8 वर्षे, मात्र मुख्य सूत्रधारांना शोधण्यात अपयश, अंनिसकडून ठिकठिकाणी निदर्शनं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI