वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे पोलीस अधिकारी रणजित कासले बडतर्फे
Ranjit Kasale: पीएसआय रणजीत कासले याने वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर फरार असलेले कासले शुक्रवारी पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आज पहाटे बीड पोलिसांनी कासले याला ताब्यात घेतले.

Ranjit Kasale: बीडमधील वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले याला शुक्रवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट येथे अटक करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षकांनी त्याला दुसरा झटका दिला आहे. पोलीस सेवेतून कासले याला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले. वाल्मिक कराड याचे एन्काऊटर करण्याबाबतचे वक्तव्य करुन रणजित कासले चर्चेत आला होता.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट रणजित कासले याने काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी आपणास दहा लाखांची ऑफर होती, असे कासले याने म्हटले होते.
पीएसआय रणजीत कासले याने वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर फरार असलेला कासले शुक्रवारी पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे बीड पोलिसांनी कासले याला ताब्यात घेतले. रणजित कासले रात्री 11 वाजता हॉटेलमध्ये आला होता. त्या ठिकाणी हॉटेलमध्ये त्याने रुम घेतली. त्यासाठी लागणारी सर्व माहिती त्याने नोंदणी बुकात भरली. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, असे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
रणजित कासले दिल्लीमधून पुण्यात आला होता. रात्री स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये तो मुक्कामी होता. बीड पोलिसांचे दहा ते बारा अधिकारी असलेले पथक पुण्यात आले. या पथकाने रणजित कासले याला ताब्यात घेतल्यानंतर बीडमध्ये नेले आहे.
दरम्यान, रणजित कासले याने गुरुवारी माध्यमांशी बोलताना आपण सरेंडर करणार असल्याचे सांगितले होते. तसेच आपण आणखी एक बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. यावेळी कासले म्हणाला, ईव्हीएम मशीनला छेडछाड होत असते. त्यासाठी 10 ते 100 कोटींपर्यंत खर्च केला जात असतो. ईव्हीएमबाबच्या आरोपाबाबत राज्य सरकार, केंद्र सरकार दखल घेणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सु मोटो दाखल करून घ्यावी, अशी मागणी कासले याने केली.
