अचानक फुटला रस्ता अन् उडाला पाण्याचा फवारा; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्याच्या तळेगाव दाभाडे इथली अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक इथला रस्ता फुटला आणि त्यातून पाण्याचे फवारे उडू लागले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात विकासकामांची पोलखोल करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनच अचानकपणे पाण्याचा प्रचंड फवारा उसळला. यावेळी रस्ताच फुटला की काय? असा आभास झाल्यानं काही काळासाठी नागरिक भयभीत झाले. हा थरारक आणि अचंबित करणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रस्त्याखालून टाकलेल्या पाइपलाइनच्या कामातील गंभीर हलगर्जीपणा यानिमित्ताने समोर आला आहे. दीड वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाइपलाइन टाकण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याचं डांबरीकरणही करण्यात आलं होतं.
पुढील आठवड्यात या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्याचं ठरलं होतं. पण त्यापूर्वीच नगरपरिषदेकडून शनिवारी पाइपलाइनची चाचणी घेण्यासाठी नव्या टाकीतून पाणी सोडण्यात आलं. या चाचणीदरम्यान अवघ्या काही क्षणांतच अचानकपणे रस्त्याच्या मधूनच पाण्याचा मोठा फवारा उसळला आणि डांबरी रस्ता फुटला की काय? असा आभास सर्वांना झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तपासणीदरम्यान पाइपलाइन जोडणी करताना कंत्राटदार महाशयांनी दोन पाइप एकमेकांना जोडलंच नसल्याचं समोर आलं. त्यामुळे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर आरोप करण्यात येत आहे.
योजनेचा शुभारंभ करण्यापूर्वीच रस्ता फुटला अन्..; पहा धक्कादायक व्हिडीओ
या प्रकरणाची गंभीर दखल घेत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दपकेकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडूनच पाइपलाइनची दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाईल, अशी माहिती दिली आहे. यानिमित्ताने तळेगावच्या विकासाची आणि कंत्राटदारांच्या दर्जाची पोलखोल झाली आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच ही घटनासुद्धा पावसामुळे झाल्याचं नागरिकांना वाटलं. मात्र तपासणीदरम्यान त्यामागील सत्य समोर आल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या रस्त्यावरून काही जण चालत जातानाही दिसत आहेत. अशातच ही घटना एखाद्याच्या जीवावर बेतली असती तर त्याला कोण जबाबदार असतं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.