तुमचं कुटुंब फोडलं, त्यांच्या चरणाशी… संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, पवार गटावर सडकून टीका

संजय राऊत यांनी डीलिमिटेशन बिलाला शरद पवार गटाने दिलेल्या पाठिंब्यावर सडकून टीका केली आहे. भाजपवर 'कुटुंब फोडल्याचा' आरोप करत राऊत म्हणाले, त्यांच्या चरणाशी जाणं 'महाराष्ट्रद्रोह' आहे. सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केल्यास महाराष्ट्राची ओळख टिकणार नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची माफी मागावी, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

तुमचं कुटुंब फोडलं, त्यांच्या चरणाशी... संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, पवार गटावर सडकून टीका
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 10:46 AM

शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीने डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार गटावर सडकून टीका केली आहे. ज्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तुमचा पक्ष फोडला. तुमचं कुटुंब फोडलं,. त्यांच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखं आहे. तुम्ही सत्तेसाठी भाजपसोबत जाणार असाल तर हा महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही. तुम्ही भाजपशी हातमिळवणी करून महाराष्ट्रद्रोह केला आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी केला आहे.

तुम्ही भाजपला मदत करणार असाल तर आधी तुम्ही अनिल देशमुखांची माफी मागितली पाहिजे. भाजप आणि शाहांमुळे ते तुरंगात गेले. नवाब मलिकांची तुम्ही माफी मागितली पाहिजे. तेव्हा मलिक महत्त्वाचे नेते होते. हे दोन्ही नेते अमित शाह आणि मोदींच्या प्रवृत्तींविरोधात लढत होते. त्यांच्यामुळे या दोन्ही नेत्यांना तुरुंगात जावं लागलं. तरीही तुम्ही त्यांच्यासोबत जात आहात. हा महाराष्ट्रद्रोह आहे, असं संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.

Loading...

यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका

शरद पवार गटाने डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल आणि तसं जाहीर केलं असेल तर त्यांच्या पक्षाच्या विचारधारेसाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हा दुर्देवी निर्णय असेल. अशा कोणत्याही पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये. तुमचे आठ खासदार निवडून आले. ते महाविकास आघाडी म्हणून आले. भाजपमुळे आले नाही. 8 पैकी 5 ठिकाणी तुम्ही भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. अशावेळी एकतर्फी निर्णय घेऊन सरकारच्या बाजूने उभे राहत असाल तर राज्यातील जनता सहन करेल असं वाटत नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

पवारांचा पाठिंबा आहे का?

पवार गट इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही, याकडे राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, कोणत्या तोंडाने जाणार? महाराष्ट्राचे शत्रू असलेल्या मोदी शाहांना पाठिंबा देणार असाल तर तुम्ही कोणत्या तोंडाने बैठकीला येणार. तुम्हाला इंडिया आघाडीत मान सन्मान मिळाला. तरीही तुम्ही एकतर्फी भूमिका घेत असाल तर तुम्हाला इंडिया आघाडीत स्थान राहणार नाही. तसेच भाजपमध्येही स्थान राहणार नाही. पवारांनी 60 वर्षात राजकारणात उत्तुंग झेप घेतली. त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सर्व नष्ट केलं आहे. अमित शाहांना पाठिंबा देण्याच्या निर्णयाला पवारांची संमती आहे का? हे स्पष्ट केलं पाहिजे, असा सवालच त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us