Satara District Central Cooperative Bank Election : चिठ्ठी फाटली अन् विजय झाला… सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत 12 जागांचे निकाल जाहीर झाले. यात भाजपने 9, राष्ट्रवादीने 8 तर शिवसेनेने 4 जागा जिंकत भाजपचे वर्चस्व कायम राहिले. कोरेगावमध्ये समान मतांमुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली, ज्यात राष्ट्रवादीचे सुनील माने विजयी झाले. पालकमंत्री शंभूराज देसाईंनीही दणदणीत विजय मिळवला, ज्यामुळे निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण 21 जागांसाठीची निवडणूक पार पडली. यावेळी 9 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उरलेल्या 12 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपने 9, राष्ट्रवादीने 8 आणि शिवसेनेने 4 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे या निवडणुकीत भाजपचंच वर्चस्व कायम राहिलं आहे. संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत एक ट्विस्टही पाहायला मिळाला. दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. एक चिठ्ठी फाटलेली निघाल्याने ती बाद करण्यात आली होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. ईश्वर चिठ्ठीत कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये चिठ्ठी फाटल्याने ट्विस्ट आला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील माने यांना 44 मते मिळाली होती. तर भाजपचे सुनील खत्री यांनाही 44 मते मिळाली होती. त्यामुळे ही निवडणूक टाय झाली होती. एक चिठ्ठी फाटलेली निघाल्याने ती बाद करण्यात आली होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या ईश्वर चिठ्ठीत दोन सुनीलपैकी कोणता सुनील विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली तेव्हा सर्वांच्या मनात धाकधूक झाली. पण अखेर ही चिठ्ठी उघडताच सुनील माने यांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड जल्लोष केला. संपूर्ण जिल्ह्यात सध्या या विजयाचीच चर्चा आहे.
शंभुराज देसाईंचा दणदणीत विजय
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारली आहे. शंभूराज देसाई यांनी त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला आहे. शंभूराज देसाई विजयी होताच साताऱ्यात एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला.
सातारा जिल्हा बँकेचे निकाल
जावळी सोसायटी मतदारसंघ
1) विठ्ठल गोळे (राष्ट्रवादी) 8
2) ज्ञानेश्वर रांजणे (भाजप) 38 मते, विजयी
खंडाळा सोसायटी मतदारसंघ
1) अजय भोसले (राष्ट्रवादी) 28 मते, विजयी
2) संजीव गाढवे (भाजप) 21 मते
3) शामराव गाढवे अपक्ष शून्य मते
महाबळेश्वर सोसायटी मतदार संघ
1) रुपाली राजपुरे (राष्ट्रवादी) 8 मते, विजयी
2) संजय मोरे (शिवसेना) 4 मते
पाटण सोसायटी मतदारसंघ
1) शंभूराज देसाई (शिवसेना) 58 मते, विजयी
2) सत्यजीत पाटणकर (भाजप) 46 मते
मान सोसायटी मतदारसंघ
1) जयकुमार गोरे (भाजप) 53 मते, विजयी
2) मनोज पोळ (राष्ट्रवादी) 14 मते
3) शेखर गोरे (शिवसेना) 7 मते