Amit Satam : दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करा, कोर्टाच्या निर्णयावर अमित साटम यांची पहिली प्रतिक्रिया
दिवाळीत फटाके फोडण्याबाबत जनजागृती करणारा दिया मिर्झाचा व्हिडिओ मुंबई महापालिकेने हटवल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाने भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली असतानाच आमदार अमित साटम यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. नेमका कोणत्या मुद्द्यावर आक्षेप आहे, हे सांगताना त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावरही भाष्य केलं आहे.

भारतामध्ये अराजकता पसरवणाऱ्यांच्या संदर्भात ज्यांना सहानुभूती आहे, या मुद्द्यांवरती आमचा काही लोकांबाबत आक्षेप होता आहे, आणि राहणार, जाती धर्म आणि भाषेच्या आधारावती कोणताही आक्षेप नाही. महापालिकेला वाटलं म्हणून व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला, त्यांनाच वाटलं म्हणून तो डिलिट केला. याच्यावरचं स्पष्टीकरण तर प्रशासनच देऊ शकेल, जे हँडल चालवतात तेच पोस्ट टाकू शकतात, ते डिलिट करु शकतात, हा त्यांचाच अधिकार असतो, अशी प्रतिक्रिया दीया मिर्झाचा व्हिडिओ हटवल्या प्रकरणावर भाजप आमदार अमित साटम यांनी दिली आहे.
येणाऱ्या काळामध्ये महापालिका असो किंवा कोणतीही संस्थांनी कशाप्रकारे आपण कोणत्या लोकांसोबत असोसिएट होत आहोत. कशा प्रकारच्या लोकांची आपण मदत घेतो किंवा कशा लोकांना आपण मदत करतो, याच्यावरती होम वर्क करुन विचार करुन निर्णय झाले, तर येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
न्यायालयानेही कोणत्या संदर्भाने ही टिप्पणी केली, त्याचा आम्ही नक्कीच अभ्यास करु. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, कोणत्याही व्यक्तीवर घेतलेला आक्षेप हा त्याच्या धर्म, जात किंवा प्रांतावरुन आधारीत नाही. आमचा आक्षेप हा आहे की, यापूर्वी आणि यानंतर पुढील काळातही भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांचा विरोध आम्ही करणार, त्यांच्याप्रती कोणतीही सहानुभूती करण्यापूर्वी व्यक्त करण्यापूर्वी विचार करावा, अशी स्पष्ट भूमिका अमित साटम यांनी माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदेतून मांडली आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळीच्या या व्हिडिओप्रकरणी उच्च न्यायलयाने भाजप नेत्यांना फटकारलं आहे. दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आपण अस्वस्थ आहोत, असं उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवलं आहे.
दिवाळीमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत या न्यायालयाच्या निर्देशांबाबत जागृती मोहिमेचा भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या विनंतीवरुन दियाने हा व्हिडिओ बनवला होता. पण त्यानंतर भाजप आमदार अमित साटम यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेत दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल आम्हाला दिया मिर्झाने धडे देण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं.
