सांगलीचा माणूस गोकुळवर, सतेज पाटलांनी भरसभेत चार संचालकांची नावे फोडली; मोठा दावा काय?
राज्य सरकारने गोकुळवर नेमलेल्या चार संचालकांविरोधात सतेज पाटलांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी नव नियुक्त संचालकांची नावे जाहीर करत, त्यापैकी एक व्यक्ती सांगलीतील असल्याचा दावा केला. राज्य सरकारला कोल्हापुरात तज्ज्ञ माणूस मिळाला नाही का, असा सवाल करत, सांगलीच्या व्यक्तीची नेमणूक म्हणजे गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याची सुरुवात असल्याचा गंभीर आरोप पाटलांनी केला.

गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्याविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात कोल्हापुरात प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला संबोधित करताना सतेज पाटील यांनी सरकारने नियुक्त केलेल्या चारही संचालकांची नावे फोडली आहेत. त्यापैकी एक तज्ज्ञ व्यक्ती सांगलीतील असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारला कोल्हापुरात तज्ज्ञ व्यकी मिळाला नाही, हे दुर्देव आहे, असं सांगतानाच सांगलीतील माणूस नियुक्त करणं म्हणजे अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्याची ही सुरुवात आहे, असा दावाच सतेज पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारने परवा अध्यादेश काढला. दुग्धविकास विभागाने काल रात्री जीआर काढला. हा जीआर अजून सुद्धा अपलोड झालेला नाही. आमचे लोक दर पाच मिनिटाने साईट बघत आहेत. पण नावे असलेला जीआर अजून अपलोड केला नाही. आम्हीही सत्तेत होतो. काही अधिकारी आमच्याही ओळखीचे आहेत. त्यांनीच मला या चारही सदस्यांची नावे सांगितली आहेत. या चार सदस्यांमध्ये येवलूस पन्हाळ्याचे शिवाजी दिनकर अडनाईक आहेत. ते केडीसी बँकेत डीओ होते. दुसरे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे आहेत. यांच्या म्हशी किती आहेत माहीत नाही. कागलचे कृष्णात ज्ञानदेव पाटीलही आहेत. यातील चौथं नाव महत्त्वाचं आहे. प्रशांत पाटोळे यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं आहे. पाटोळे हे सांगलीतील आहेत, असा दावा सतेज पाटील यांनी केला.
सुरुवात झाली आहे…
कोल्हापुरात यांना महायुतीतील नेत्यांना न्याय देता आला नाही. महायुतीतील लोकांना गोकुळवर घेता आलं नाही. शिंदे गटालाही न्याय दिला नाही. अशोक फराटेंना न्याय मिळाला नाही. सांगलीचा माणूस गोकुळवर तज्ज्ञ संचालक म्हणून आला आहे. ही नावे मी मुद्दाम वाचली आहेत. कोणाला घेतलंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. या जिल्ह्यात एखादाही पात्र माणूस मिळाला नाही का? चौथा माणूस बाहेरचा का घेतला? तुम्हाला कोल्हापुरात एकही माणूस सापडू नये यासारखं दुर्देव नाही, असं सांगतानाच अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्याची सुरुवात सांगलीचा माणूस देऊन झाली आहे, असा दावाही पाटील यांनी केला आहे.
पाटील, मुश्रीफांचं पाप
हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यामुळे चार संचालक नेमण्याचा निर्णय झाला आहे. हे पाप या दोघांचं आहे. दोघांचं षडयंत्र आहे. सहकार संपवण्याचं आणि लोकशाही संपवण्याचं यांचं षडयंत्र होतं. माझी लोकं निवडून आणायला मी पायाला भिंगरी लावून जात होतो. यात माझं काय चुकलं? माझ्या माणसांना निवडून आणण्यासाठी मी लढू नये का? मला समोरून फोन येत होते. आम्हाला मतदान करायचं आहे. नावं सांगा. मी म्हटलं 25 लोकं माझी आहेत. त्यांना मतदान करा. तुम्ही तर सिंगल मते मागितली. तुम्ही तुमच्या पॅनलशी प्रामाणिक राहिला नाहीत, असा घणघाती हल्ला त्यांनी केला.
